उस्मानाबाद / प्रतिनिधी -

जागतिक खो खो स्पर्धा घेण्याबाबत महाराष्ट्र खो खो असोसिएशनची चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिले.

उस्मानाबाद येथे ५५ व्या पुरुष महिला राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय खो खो महासंघाचे सचिव एम. एस.त्यागी यांनी ३२ देश सहभागी होणाऱ्या जागतिक स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याची विनंती केली होती. त्यास  उत्तर देताना श्री. पवार बोलत होते.

यावेळी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मधुकर चव्हाण, महाराष्ट्र खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, महेश गादेकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव गोविंद शर्मा आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, उस्मानाबाद जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल खोचरे, सचिव प्रवीण बागल यांनी केले. यावेळी खोखोतील अर्जुन पुरस्कार विजेत्या शोभा नारायणन, सुषमा सारोळकर, सारिका काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. रहिमान काझी यांनी आभार मानले. 

श्री. पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, उस्मानाबाद खो-खो असोसिएशनने चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही त्रुटी राहीली तर आयोजकांच्या निदर्शनास आणुन द्या, त्या दुर केल्या जातील. स्पर्धेच्या चांगल्या आठवणी तुम्ही आपापल्या राज्यात घेऊन जाल, असा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेटबरोबर अन्य सांघीक खेळाडूंनी चांगली चमकदार कामगिरी दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी सातव्यांदा विजेतेपद पटकावले. त्या स्पर्धेत युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. धाराशीव उर्फ उस्मानाबाद जिल्ह्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. जिल्ह्यातील खो-खोपटूंना शिव छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यांना घडविणार्‍या डॉ. चंद्रजीत जाधव यांनाही शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार येथील सारीका काळेला मिळाला. या खेळाडूंनी धाराशीवचे नाव महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव जागतीकस्तरावर नेणारे खेळाडू तयार होत आहे.  फलटणमध्ये चांगली स्पर्धा झाली. उस्मानाबादला विश्‍वास देतो तुमच्या डोळयाचे पारणे फिटेल असा खेळ दाखवतील.

 
Top