उस्मानाबाद / प्रतिनिधी -

जिल्हयातील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.यासाठी त्यानी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या २९ ऑक्टोबरच्या पत्राचा संदर्भ दिला आहे.

आमदार घाडगे पाटील यानी पत्रामध्ये म्हटले आहे की,धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हयामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.धाराशिव तालुक्यातील ७४ हजार ८२४ शेतकऱ्यांचे ५९हजार ५६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी ८१ कोटी ५० लाख रुपये, भुम तालुक्यातील २१ हजार ५७२ शेतकऱ्यांचे १८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी २५ कोटी ६० लाख रुपये,परंडा तालुक्यातील २७ हजार ८३४ शेतकऱ्यांचे १४ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी १९ कोटी ८७ लाख रुपये,कळंब तालुक्यातील ४५ हजार २२२ शेतकऱ्यांचे ३९ हजार ७२५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी ५४ कोटी रुपये,वाशी तालुक्यातील ३० हजार ४५५ शेतकऱ्यांचे ३१ हजार ४३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.यासाठी ४२ कोटी २१ लाख रुपये असे धाराशिव जिल्ह्यातील एकूण एक लाख ९९ हजार ९०७ शेतकऱ्यांचे एक लाख ६३ हजार ६९८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी २२२ कोटी ७३ लाख रुपयांची आवश्यकता आहे.ही प्रलंबित असलेली रक्कम दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. जिल्हाधिकारी यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या २२२ कोटी ७३ लाख एवढया रकमेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केला होता.हा प्रस्ताव मदत व पुर्नवसन विभागास प्राप्त झाला असुन धाराशिव जिल्हयात झालेल्या नुकसान भरपाईसाठीचा २२२ कोटी ७३ लाख रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.या प्रस्तावास मंजुरीसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आवश्यक असुन अदयापपर्यत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आयोजित केलेली नाही. आहे. बैठकीसाठी वेळ द्यायची संचिका गेल्या पंधरा दिवसापासून प्रलंबित असल्याचे सांगुन आमदार घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना त्याचे स्मरण करुन दिले आहे. बैठकीसाठी वेळ न दिल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे. मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करुन या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. आपण उपसमितीची बैठक आयोजित करुन धाराशिव जिल्हयातील २२२ कोटी ७३ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेस मंजुरी दयावी,धाराशिव जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रातील सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसान भरपाईची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी मागणी आमदार घाडगे पाटील यानी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

 
Top