उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील कळंब रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबा देण्यात यावा. या भागातील जवळपास १०० गावांतील लोकांची गैरसोय होत आहे. या थांब्यासाठी अनेक वेळा रेल्वे मंत्राकडे देखील पाठपुरावा केला. मात्र रेल्वे प्रशासनाचे अधिकारी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. याच्या पाठीमागे मोठ्या राजकीय शक्तीचा हात असण्याची शक्यता असल्यामुळे येत्या एक महिन्याच्या आत रेल्वे थांबा देण्यात यावा. अन्यथा या भागातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष कोंडाप्पा कोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२० नोव्हेंबर रोजी दिला.  

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील कळंब रोड रेल्वे स्टेशनवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तानाजी जमाले, गणेश करंजकर, अजिंक्य भालेराव, तुळशीदास जमाले, तानाजी भालेराव, प्रा. मारुती कारकर, तेजस भालेराव, संजय वाघ, अरुण पाटील, नानासाहेब वाघ आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना कोरे म्हणाले की, १९०५ सालापासून बार्शी लाईट रेल्वे कंपनीची नॅरोगेज रेल्वे मिरज ते कळंब (कसबे तडवळे) रोडपर्यंत होती. न्यारोगेचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झाल्यानंतर या स्टेशन मध्ये २८५ मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. तर स्टेशनवर कॅन्टीन, सुलभ शौचालय व्यवस्था, पाणी, लाईट स्टेशन मास्तर व इतर कामगारांसाठी निवास खोल्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. तर रेल्वे बोर्डाच्या मुंबई येथील कार्यालयामध्ये याबाबत चौकशी केली असता ऑनलाईन रेकॉर्डवर रेल्वे क्रॉसिंगसाठी ३ ट्रॅक, सिग्नल व्यवस्था, पोर्ट रेल्वे कर्मचारी स्टाफ दाखविला जात आहे. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म ऑपरेटिंग क्रॉसिंग स्टेशन दाखवत असून सिग्नल व ऑपरेटिंग क्रॉसिंग सेंटर मंजूर आहे. त्यासाठी मातीच्या भरावाचे काम पूर्ण झालेले असून त्यासाठी खडी, रेल्वे रूळ व स्लीपर हे सर्व साहित्य जाग्यावर असताना प्रशासनाने येथील सर्व साहित्य बेकायदेशीर व अनधिकृतपणे उचलून नेलेले आहे. तसेच रेल्वे बोर्डाने ठरवून दिलेल्या मानदंडानुसार या रेल्वे स्टेशनचे उत्पन्न जास्त आहे. तर शेंद्री रेल्वे स्टेशनचे उत्पन्न झिरो असताना तेथे थांबा दिला जातो. मात्र कळंब रोड रेल्वे स्थानकावर का स्थान थांबा दिला जात नाही ? ही अन्याय कशासाठी लागू केला जातो ? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. या स्थानकावरून बीड जिल्ह्यातील ३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ तालुक्यातील नागरिकांची दळणवळणाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने एक महिन्यापर्यंत हा थांबा सुरू करावा. अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.


 
Top