उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 ऑनलाईनवर मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी ऑनलाईन कंपन्या व व्यापारी आहेत. त्यामुळे भारतातील पैसा देशात मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे भारतातील व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत असून ते अत्यंत दुर्दैवी आहे. ते रोखण्यासाठी भारत ई-पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या फोटोच्या माध्यमातून तळागाळापर्यंत सक्षम करण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दि.३१ ऑक्टोबर रोजी दिले.

उस्मानाबाद येथील पुष्पक मंगल कार्यालयात उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने 

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष संतोष सोहनी, जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, मराठवाडा जिल्हा सचिव विनोद पिंगळे, लक्ष्मीकांत जाधव, एचडीएफसी बँकेचे विभागीय व्यवस्थापक अशोक शिंदे, संजय मोदाणी, किशोर गोरे आदीसह नूतन पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना निवंगुणे म्हणाले की, व्यवसाय करणे सोपे आहे परंतु ते सांभाळणे खूप अवघड आहे. तसेच रोजगार निर्माण करण्याचे एकमेव सेक्टर म्हणजे व्यापारी संघटन असून ही संघटना बांधणे एकाचे काम नसून ते सर्वांचे आहे. त्यामुळे भारत ई-पोर्टलच्या माध्यमातून आलेला प्रत्येक संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व व्यापाऱ्यांनी करावे असे आवाहन केले. तर त्यासाठी प्रत्येकाने मोबाईलचा वापर केवळ संघटना वाढविण्यासाठीच नव्हे तर व्यापार वाढविण्यासाठी देखील करणे आताची गरज आहे. विशेष म्हणजे आताची मुख्य बाजारपेठ ही मोबाईल असल्यामुळे परिस्थितीनुसार बदल करावा व ते अवगत करणे प्रत्येकाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन वर वस्तू मागविण्यामध्ये आयटी पार्क अग्रेसर असून तुम्ही देखील तुमच्या व्यवसायाची माहिती व्हाट्सअप फेसबुक वर दररोज टाकलीच पाहिजे. ऑनलाईनच्या संकटातवर जपान व चीन या दोनच राष्ट्रांनी केवळ भाषेच्या जोरावरच सक्षमपणे मात केली आहे. कारण या देशाची भाषा एकच आहे मात्र भारतात अनेक भाषा असल्यामुळे यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी भारत ई-पोर्टलची निर्मिती केली असून देशातील जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी यावर आपली नोंदणी करावी असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. सर्वात महत्त्वाची म्हणजे व्यापाऱ्यांना कायद्याची माहिती असावी यासाठी दर महिन्याला संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मण जाधव यांनी जिल्ह्यात खवा, गुळ क्लस्टर होत असून शेती सोलर सारखे उद्योग मोठ्या प्रमाणात उभा राहत असून जिल्ह्यासाठी व्यापारी महासंघाचे कार्यालय व्हावे अशी मागणी ही त्यांनी केली. तर संतोष सोहनी यांनी या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. तर एचडीएफसी बँकेचे प्रमोद धोंगडे यांनी बँकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना उपलब्ध असलेल्या व दिल्या जाणाऱ्या सुविधा बाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नूतन प्रदेश उपाध्यक्ष संजय मंत्री यांनी तर सूत्रसंचालन अभिलाष लोमटे यांनी व उपस्थितांचे आभार धनंजय जेवळीकर यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top