उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर 2022 पासून शासनाने गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य आणि सांसर्गिक लंम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व गोवंशीय पशुधनास लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 दि. 30 ऑक्टोबर 2022 अखेर 96 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये लंम्पी चर्मरोग नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून आवश्यक आहे. यासाठी राज्यभर “माझा गोठा स्वच्छ गोठा” ही मोहीम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नियमा नुसार लंम्पी चर्मरोग नियंत्रण आणि रोगमुक्त महाराष्ट्रासाठी “माझा गोठा स्वच्छ गोठा” या मोहिमे अंतर्गत राज्यातील बाधीत शहरे, गावे, वाड्या, वस्त्या, पाडे, तांडे येथील पशुधनाचे सर्वेक्षण आणि लंम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी पशुपालकांना जैव सुरक्षा उपाय आणि अनुषंगीक आवश्यक प्रशिक्षण द्यावयाचे आहे. ही मोहीम दि. 07 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2022 या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

 मोहीम कालावधीमध्ये बाधीत गावामध्ये गोठा भेटी घेण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार करणे. एका पथकामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगर परिषद यांच्याकडील स्वयंसेवक समवेत असतील. हे पथक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांना मोहीम कालावधी दरम्यान भेट देईल. भेटी दरम्यान पशुपालकांचे नाव, त्यांच्या गोठ्यातील पशुधनाचे बाधित किंवा अबाधित याबाबतची माहिती घेण्यात येणार आहे. गाव भेटी दरम्यान लंम्पी चर्मरोग सदृष्य लक्षणे असणाऱ्या गोधनास जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेमध्ये तात्काळ संदर्भित करून त्या पशुधनास विद्यापिठाच्या एसओपी नुसार सुधारीत प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात येणार आहेत. मोहिमे दरम्यान गावातील पशुपालकांना प्रशिक्षणाच्या वेळी लंम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी जैवसुरक्षा उपाययोजनांचे प्रशिक्षण आणि लंम्पी चर्मरोग प्रादूर्भाव संदर्भात घ्यावयाची काळजी आणि सूचना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमे करिता जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली समिती करण्यात आली आहे. या गठीत समितीने दिनांक निहाय भेटीचे गावांचे नियोजन करण्यात येत आहे.

 या जिल्हास्तरीय समितीत अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत.तर सदस्य म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धनचे उपायुक्त आणि सदस्य सचिव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अशाप्रकारे समिती गठीत करण्यात आली आहे.

 या मोहिमे अंतर्गत प्रोत्साहन म्हणून नमुद निकषावर आधारित जिल्हा निहाय पुरस्कारांचे वितरण करण्याचे नियोजित असल्याने माहिमे दरम्यान लोकप्रतिनिधी, ग्रामविकास, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, खाजगी पशुचिकीत्सक आणि सेवादाता यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेण्यात यावा, असे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.


 
Top