कळंब (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू सामाजिक संस्था खोंदला, ता. कळंब, यांच्या वतीने “मी ज्ञानी होणार“ हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा उपक्रम राज्यातील सुमारे 350 शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.

या उपक्रमांतर्गत दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाच सामान्य ज्ञान प्रश्न शाळांना पाठवले जातात. हे प्रश्न शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिले जातात, आणि विद्यार्थी त्यांची नोंद वहीमध्ये करून घेतात. दुसऱ्या दिवशी परिपाठात या प्रश्नांची उजळणी केली जाते. याशिवाय, दर महिन्याला संस्थेच्या पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे सराव परीक्षा घेतली जाते.

या उपक्रमामुळे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिकी स्कूल परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू शकत आहेत. या उपक्रमातील अंतिम परीक्षा 12 जानेवारी  रोजी होणार असून, राज्यभरातील सुमारे 30,000 विद्यार्थी यात सहभागी होतील. अंतिम परीक्षेत प्रत्येक शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, शाळांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. राज्यस्तरीय परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम 30 विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत 501 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. “मी ज्ञानी होणार“ उपक्रमाने शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही याबाबत मोठा उत्साह आहे.

 
Top