उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा रुग्णालय  आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम नुकताच जिल्हा परिषदेतील यशवंतराव सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.

  यामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची  बी. पी. आणि शुगर तपासणी करण्यात आली. एकूण 154 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पूर्वीपासून उच्च रक्तदाब असणारे कर्मचारी  18, पूर्वीपासून मधूमेह असणारे  10, पूर्वीपासून उच्च रक्तदाब आणि मधूमेह असणारे कर्मचारी  5 तसेच संशयीत उच्च रक्तदाब असणारे 4, संशयीत मधूमेह असणारे 7 कर्मचारी आढळून आले. त्यांना पुढील तपासणी आणि उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले.

 यावेळी माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे बैठे काम, वाहनाचा अतिरिक्त वापर, अनियंत्रित आहार, व्यायामाचा अभाव या कारणांनी आणि वयाची तीशी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीला मधुमेहाच्या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे झाले आहे. कारण मधुमेह ही पहिली पायरी असते आणि त्यानंतर रक्तदाब, हृदयविकार असे विकार होऊ शकतात. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी प्रतिबंधात्मक उपायही सांगितले यामध्ये आपले वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढू न देणे, संतुलित आणि चौरस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, मद्यपान तसेच धुम्रपान टाळणे, ठराविक कालावधीने संपूर्ण शारीरिक तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच  EDUCATION TO PROTECT TOMARROW  या वर्षीच्या घोषवाक्याविषयी माहिती देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

  जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली.


 
Top