जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील पोपटराव लुगडे हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत. एकेकाळी इतरांच्या शेतीत मोलमजुरी करणारे, 50-60 रुपयांवर काम करणारे मजूर म्हणून पोपटरावांची ओळख होती. स्वत:ची घरची पाच एकर जमीन करत इतरांच्या शेतीत काम करत ते आपला उदरनिर्वाह करत असत. त्यांच्या या जीवनाला कलाटणी मिळाली ती म्हणजे ‘तु’ आणि ‘ती’ च्या शेती व्यवसायाने म्हणजेच तुतीच्या शेतीने.

    खामकरवाडी गावाची ओळख ही फक्त मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे गाव म्हणून होती. पण त्याच गावची ओळख आज “रेशीम शेती उत्पादकाचे” गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे. आज या गावातील 80 टक्के शेतकरी तुतीची लागवड करुन लखपती होण्याच्या मार्गावर आहेत.

 2006-07 मध्ये पोपटरावांनी आपल्या शेतीत प्रथम तुतीची लागवड केली. त्यांना तुतीची लागवड करावी ही प्रेरणा ते ज्या ठिकाणी कामासाठी जात होते, त्या ठिकाणी मिळाली. प्रथम त्यांनी एक एकरवर तुतीची लागवड केली. पहिल्या तीन वर्षापर्यंत एक एकर मधील उत्पन्नावर त्यांनी आपली चांगली आर्थिक प्रगती केली. नंतर त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान आणि उत्पन्नातून नवीन दोन एकरवर पत्नीच्या नावे तुती लागवड केली. शासनाकडून त्यांना अनुदान तर मिळालेच पण त्याचबरोबर तुतीची झाडी कट करण्याची मशीन आणि इतर साहित्य देखील मिळाले. पुढे त्यांच्या मुलाचे दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आजच्या काळात नोकरीची शाश्वती नसल्याने त्यांनी त्यालाही या रेशीम उत्पादनाशी निगडीत तुतीच्या शेतीतच पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी आणखी एक एकरवर तुतीची नवीन लागवड केली. असे एकूण त्यांचे तुतीच्या लागवडीखालील क्षेत्र हे चार एकर झाले आणि तीन शेडही तयार केले. त्यातून त्यांना आज घडीला वार्षिक उत्पन्नही साधारणत: दहा ते बारा लाखापर्यंत मिळण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक परिस्थीती सुधारल्यामुळे त्यांनी प्रत्येक वर्षी एक-दोन एकर नवीन जमीन घेण्यास सुरुवात केली. असे करत आजतागायत त्यांची पहिली स्वत:ची पाच एकर आणि नवीन खरेदी केलेली आठ-साडेआठ एकर जमीन आहे. अशी सर्व मिळून 13-14 एकर जमीनीचे आज ते मालक आहेत. त्यामुळेच आज त्यांची ओळख एक शेत मजूर न राहता “करोडपती” म्हणून झाली आहे. 

   त्यांच्या या प्रेरणेने आज त्या गावातील 80 टक्के शेतकरी हे तुतीचे उत्पादन घेत आहेत. एकेकाळी मजुरीला जाणारे लोक आज रेशीम शेतीमुळे लखपती झाले आहेत. पोपटरावांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे त्यांनी त्यांच्या लहान मुलाला गावातच ॲटोमोबाईलचे दुकान टाकून दिले आहे. रेशीम शेतीच्या उत्पन्नामुळे झोपडपट्टीत राहणारे पोपटराव यांनी आज गावात टोलेजंग वीस लाखांचे घर बांधले आहे.

  केंद्रशासनाच्या योजनेतून त्यांनी रेशीम शेतीस सुरुवात केली होती. सुरुवातीस लाकडी शेड उभारले. नंतर उत्पन्नातून त्यांनी चांगल्या प्रकारचे शेड उभारणी केले. उत्पन्नातून सुरुवातीला त्यांना एकरी अडीच लाखापर्यंत निव्वळ नफा मिळू लागला. त्यांनी पुढे सांगितले की, तुती ही हलक्या आणि चांगल्या अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीवर लागवड करता येऊ शकते. दोन्हीही शेतीतून चांगलेच उत्पन्न मिळते. हलक्या जमिनीस फक्त एखादे जास्तीचे पाणी द्यावे लागते. सर्वसाधारण जमीन असेल तर किमान 15 दिवसांतून एकदा पाणी तुती या पिकास द्यावे लागते. या पिकांस उन्हाळ्यात पाणी नसले तरी चालू शकते. इतर पिकांस पाणी हे द्यावेच लागते. त्यामुळे हे पीक घेणे फायदेशीर आहे. सलग चार महिन्यांपर्यंत हे पीक विना पाण्याचे जीवंत राहू शकते.

  पोपटरावांनी ज्यावेळी रेशीम शेतीस सुरुवात केली तेंव्हा त्या गावातील एकही शेतकरी रेशीम शेती करण्यास तयार नव्हता. पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आज जवळपास गावातील 80 टक्के शेतकऱ्यांच्या शेतात तुती लागवड केलेली पाहवयास मिळते ते पोपटरावांच्या आर्थिक परिस्थितीच्या सुधारणेमुळेच.


श्रीकांत चंद्रकांत देशमुख

 जिल्हा माहिती कार्यालय,

 उस्मानाबाद 

 
Top