(फोटो/राहुल कोरे)


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी आहे. या भूमीत परराज्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून स्वागत करतो. महााष्ट्राने आजपर्यंत सर्व प्रकारच्या खेळांचा गौरव वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने देशाला चमकदार कामगिरी करणारे खेळाडू दिले आहेत, असे प्रतिपादन  महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित  पवार यांनी  केले.

येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात होत असलेल्या ५५ व्या पुरूष-महिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते.   यावेळी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, खासदार ओमराजे  निंबाळकर, अामदार कैलास पाटील, माजी आमदार मधुकर चव्हाण,  जिल्हाधिकारी डाॅ.सचिन ओम्बासे, पोलिस अिधक्षक अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अामदार अभिमन्यू पवार, महेश गादेकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव गोविंद शर्मा, उस्मानाबाद जिल्हा खो-खो संघाचे अध्यक्ष अनिल खोचरे आदी उपस्थित होते.  भारतीय खो खो महासंघाचे सचिव एम. एस.त्यागी यांनी ३२ देश सहभागी होणाऱ्या जागतिक स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याची विनंती या प्रसंगी केली.  यावर बोलताना जागतिक खो खो स्पर्धा घेण्याबाबत महाराष्ट्र खो खो असोसिएशनची चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. 

होत असलेली ही राष्ट्रीय खो खो स्पर्धा सर्व उस्मानाबादकरांची आहे ही यशस्वी करण्याची जबाबदारी  आपल्या सर्वांची आहे.  उस्मानाबादकर किती चांगल्या प्रकारे स्पर्धेचे आयोजन करू शकतात हे यातून दाखवायचे आहे . त्यामुळे उस्मानाबादचे मागासले पण   पुसण्यासाठी  ही  मोठी संधी आहे, असे राष्ट्रीय खो-खो महासंघाचे महासचिव प्रा.डा. चंद्रजीत जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले. यावेळी जिल्हा खो-खो संघाचे अध्यक्ष  अनिल खोचरे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. 

उपस्थितांचे स्वागत  डॉ. चंद्रजित जाधव,  अनिल खोचरे, सचिव प्रवीण बागल यांनी केले. यावेळी खो-खोतील अर्जुन पुरस्कार विजेत्या शोभा नारायणन, सुषमा सारोळकर, सारिका काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. रहमान काझी यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची नृत्याच्या माध्यमातून जीवनशैली दाखविण्यात आली. (फोटो/राहुल कोरे)


 
Top