उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांना रेशीम उद्योग करण्यासाठी म्हणजेच तुतीची लागवड करण्यासाठी आवश्यक असलेली रोपे बाहेरून आणावी लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावागावातील महिला बचत गटाच्या महिलांनी तुतीची रोपे आपल्या गावातच उपलब्ध करून देण्यासाठी नर्सरी सुरु कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज केले.

  उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि) येथे फळबाग लागवड व तुती लागवड या कार्यक्रमाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे, जिल्हा रेशीम अधिकारी ए.व्ही. वाकुरे, सरपंच बळीराम कांबळे, उपसरपंच देवकन्या मोरे, माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, ग्रामसेवक सुदर्शन घोगरे, कृषी सहाय्यक अजित चव्हाण, विस्तार अधिकारी डी. टी. साळुंखे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. ओंबासे म्हणाले की, महाराष्ट्र जीवनोन्नती ग्राम विकास अभियान अर्थात उमेद या माध्यमातून सक्रिय असलेल्या बचत गटांनी तुतीची रोपे तयार करण्यासाठी भाडेपट्टयाने शेती घ्यावी. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मदत केली जाईल. यावर्षी जिल्ह्यामध्ये 100 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.

   जिल्ह्यात बाहेरून रोपे आणण्यापेक्षा गाव स्तरावर जर रोपे उपलब्ध झाली तर खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल. त्याबरोबरच बचत गटातील महिलांना देखील रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे तुती शेती उद्योग अतिशय चांगला असून लागवड केल्यापासून प्रती एकरी संबंधित शेतकऱ्यासह शेतात राबणाऱ्या मजुरांना सलग तीन वर्ष रोजगार हमी योजनेच्या दरानुसार दर महिन्याला निश्चितच रोजगारापोटी 14 हजार रुपये मिळणार आहेत. मात्र त्यासाठी तुती लागवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर रेशीम कार्यालयातील इंगळे यांनी तीन गुंठ्यामध्ये तीन महिन्यात आठ हजार रुपये उत्पादन मिळत असल्याचे सांगून वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील अनेक शेतकरी तुतीची यशस्वी शेती करीत असल्याचे सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top