उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात फळे आणि भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. विशेषत: द्राक्ष, डाळींब, आंबा, संत्री या फळपिकांची आणि विविध भाजीपाला पिकांची व्यावसायिक दृष्टीकोनातून लागवड करुन नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येत आहे. जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांबरोबर स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत विशेषत: किडनाशक उर्वरीत अंशाबाबत जागरुकता निर्माण झाली आहे.

 राज्यातील जास्तीत जास्त फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन करुन युरोपीयन आणि इतर देशांना निर्यात केले जाते. युरोपीयन देशांनी किडनाशके उर्वरीत अंश मुक्ताची हमी अट घातल्याने 2004-05 पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात येते. 2022-23 या वर्षाकरिता नोंदणी करण्याची कार्यवाही उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सुरु आहे. या कार्यालयामार्फत आज तागायत ग्रेपनेटच्या प्रणालीवर 550 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मँगोनेट प्रणालीवर 39, ओनियन नेट प्रणालीवर 25 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व द्राक्ष बागायतदार, आंबा बागायतदार, डाळींब उत्पादक शेतकरी, संत्रा, मोसंबी, लिंबु उत्पादक शेतकरी तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना अपेडाच्या साईटवर ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. द्राक्ष (ग्रेपनेट) ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023, आंबा (मँगोनेट) 15 नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023, तसेच डाळींब (अनारनेट), भाजीपाला (व्हेजनेट), लिंबुर्गीय फळपिके (सिट्रसनेट) आणि बिलवाईननेट अशाप्रकारे ऑनलाईन नोंदणीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

 ग्रेपनेट कार्यप्रणालीवर द्राक्ष बागेची नोंदणी करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांनी आपले अर्ज, शेताचा दर्शक नकाशा आणि 7/12, 8 अ उतारा, 50 रुपये शुल्क भरुन नजिकच्या कृषी विभागाच्या कार्यालयास सादर करावा. द्राक्षबाग नोंदणी प्रमाणपत्राची वैधता ही तीन वर्षासाठी असली तरी दरवर्षी बागाचे नुतनीकरण करुन घ्यावे लागेल. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या फळे व भाजीपाला बागांची ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर यांनी केले आहे.

 
Top