उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अतिवृष्टी,सततचा पाऊस व पीक विमा याचे पैसे सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे सोमवार 24 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 8 वाजल्यापासून आमरण उपोषण करणार आहेत. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती, ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार ते आमरण उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत करणार आहेत. शेतकरी संकटात व दुःखात असल्याने मी दिवाळी शेतकऱ्यांसोबत उपोषण स्थळी करणार असून खराब झालेल्या सोयाबीनच्या राशीचे लक्ष्मीपुजन करणार असल्याचेही ते म्हणाले.

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा बांधावर जात आहेत तर उस्मानाबादमध्ये शिवसेना आमदार पाटील हे सरकारचे डोळे उघडण्यासाठी आमरण उपोषण करणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याला विमा कंपनी व सरकारकडे शेतकऱ्यांच्या मदतीचे 1200 कोटी रुपये मिळणार असून ती रक्कम थकीत आहे. ऐन दिवाळीत ठाकरे गट आमरण उपोषण व गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार असल्याने सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.

 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पिक विम्याची 531 कोटी रुपये जिल्ह्याची तीन लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात तात्काळ जमा करावी. 531 कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रकमेत कोणतीही छुपी कपात करू नये. सन 2020-21 च्या पिक विम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी रुपयाची रक्कम ही विमा पात्र सहा लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे. सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी डगफुटी रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 248 कोटी रुपये दोन लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे.चालू खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी ढगफुटी पिकावरील रोगराईमुळे संपूर्ण पिके आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि पीडित शेतकऱ्यांना जीव घेण्या आर्थिक संकटातून दिलासा द्यावा. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आजपर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे बाराशे कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.


 
Top