परंडा / प्रतिनिधी -

शिंदे गुरुजींनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवर्क्षात रूपांतर झाले असे मत या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात रविवार दि.३० रोजी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात व्यक्त केले.ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून परंडा येथील ज्येष्ठ शिक्षक शिवाजी कदम तर व्यासपीठावर पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, प्रा दत्तात्रेय मुळीक, प्रा ज्ञानदेव मांजरे, प्रा संजीवन गायकवाड, प्रा दत्तात्रय मांगले, प्रा डॉ अरुण खर्डे व माजी विद्यार्थी संघटनेचे चेअरमन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. 

      या रौप्य महोत्सव स्नेह मेळाव्यासाठी १९९७ च्या  शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली तब्बल २५ वर्षानंतर एकत्रीत येऊन उपस्थिती दर्शविली.या स्नेह मेळाव्यामध्ये  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रा गे शिंदे गुरुजी व महाविद्यालयातील कै.विजय वाघमारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वागत गीत सादर करण्यात आले. याच महाविद्यालयातील कै.विजय वाघमारे, श्री कोठुळे, श्री महेश शिंदे, श्री मासाळ लिंबराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

      यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली.२५ वर्षानंतर या महाविद्यालयात आल्यानंतर एक वेगळा अनुभव अनुभवास मिळला असल्याचे मत सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.विविध क्षेत्रात काम करत असताना या महाविद्यालयाने दिलेले संस्कार आत्मसात करून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत आहोत.भविष्यात या महाविद्यालयास आमची गरज भासल्यास आम्ही नक्कीच आर्थिक सहकार्य करू असेही आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांचा मुलगा शशांक चंदनशिवे यांनी कराटे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकाविला असल्याने व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     पुढे अध्यक्षीय समारोप करताना  प्राचार्य चंद्रकांत घुमरे सर म्हणाले की जेव्हा विद्यार्थी आनंदी दिसतो तेव्हाच कळते की शिक्षकांच्या जीवनाचे सार्थक झाले. प्रत्येकाच्या आयुष्यात ध्येय असावीत आणि ती ध्येय तुम्ही समोर ठेवून तुमच्या जीवनाचं सार्थक केलं याचा आम्हास आनंद वाटतो .नोकरी हे जीवनाचे अंतिम ध्येय नाही तर उद्योगधंदे जीवनामध्ये यशस्वी बनवतात तेव्हा विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग धंद्याकडे वळले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र पाटील, अभिजीत काळे, विश्वास निकत ,अमोल कांबळे, जयंत पवार ,राहुल बेदमुथा, धनाजी नरसाळे ,सुभाष वाघमारे, शरद पाटील, भरतरी कुलकर्णी आणि युवराज पाटील यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास निकत यांनी केले तर आभार प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी मानले.


 
Top