उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सोयाबीनचे नुकसान, आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद तालुक्यातील घुगी व मेंढा येथील दोन युवा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. 

उस्मानाबाद तालुक्यातील घुगी येथील अशोक ज्ञानदेव हासवे (वय ३२) या शेतकऱ्याने सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात यावर्षी सातत्याने विविध प्रकारे पिकांवर आलेल्या संकटामुळे उतार कमी येईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केली. शेतात भरमसाठ खर्च करूनही सोयाबीनला कमी उतार व कमी भाव मिळत असल्याने तसेच शासनाकडून यासाठी ही कोणतीही आर्थिक स्वरूपाची मदत न मिळणे, या कारणामुळे हासबे यांनी गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील तीन भाऊ असा परिवार आहे. तर आदल्या दिवशी मेंढा येथील शेतकरी अमोल सुरेश गिरी (वय २७) याने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्याही शेतात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पाण्यात गेले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते वैफल्यग्रस्त होते. अशात कोणतीही शासनाची मदत न मिळाल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यास एक भाऊ, आई, वडील असून आई येरमाळा येथे दर्शनासाठी गेली होती व वडील सालगडी म्हणून काम करतात.

या दोन्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तालुका हादरला असून त्यांच्या मृत्यूनंतर तरी शासनाने दिलेले आश्वासन पाळून मदत शासनाची शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होईल काय, अशा संतप्त सवाल

शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. याबाबत बेंबळी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पाडोळी दुरुक्षेत्राचे पोलिस हवालदार नवनाथ बांगर अधिक तपास करीत आहेत.

 
Top