उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोणाच्याही आधाराविना शेती करून कुटुंब चालवणाऱ्या, बचत गटाच्या माध्यमातून 

महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या तसेच डॉक्टर, शिक्षिका, वकील, उद्योजिका अशा विविध क्षेत्रातील रणरागिणींचा उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने “मी नवदुर्गा “ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती फौजीयाताई खान, प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण व विभागीय अध्यक्ष वैशालीताई मोटे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा पाटील यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शुभांगीताई नलावडे या होत्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना, सरस्वती नाही तर शिक्षणाची देवता म्हणून सावित्रीबाई फुले यांची पूजा व्हायला पाहिजे, असे मत नलावडे यांनी व्यक्त केले.

 मागील आठवड्यात उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेत याची उस्मानाबाद येथूनच सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पती गेलेल्या शुभांगीताई नलावडे व अनिताताई गरड यांना जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील यांनी कुंकू लावले. यावेळी दोघींचे मन भरून आले होते.

 या नवदुर्गांचा सन्मान

मी नवदुर्गा या उपक्रमांतर्गत शिक्षिका शुभांगीताई नलावडे, जिम चालक राणीताई भोईटे, अधिसेविका सुमित्राताई गोरे, डॉ. अस्मिताताई बुरगुटे,  परिसेविका सुमनताई जावरकर, कल्पनाताई निपाणीकर, बचत गट प्रतिनिधी सुनीताताई जगदाळे,  व्यसनमुक्ती केंद्र संचालिका डॉ. पल्लवीताई तांबारे, शेतकरी अनिताताई गरड, उद्योजिका सौ.किरणताई निंबाळकर या विविध क्षेत्रातील महिलांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


 
Top