उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यात दि.10 ऑक्टोबर 2022 या दिवशी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम (National Deworming Campaign) आणि मॉप अप दिन 17 ऑक्टोबर 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील सर्व एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा, अनुदानीत शाळा आणि सर्व अंगणवाड्यांमधून कोव्हीड 19 मार्गदर्शक सूचनांचे अवलंब करुन राबविण्यात येणार आहे. या धर्तीवर जिल्हयात दि. 10 ऑक्टोबर 2022 पासून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय जंनाशक दिन मोहिमेचा उद्देश हा एक ते 19 वर्षे वयोगटीतल सर्व मुला-मुलींना शाळा आणि अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्याचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.

 या NDD राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ भुम तालुक्यातील हांडोग्री येथील भगवंत विद्यालय येथे करण्यात आला. या प्रसंगी बोलताना डॉ. कुलदीप मिटकरी यांनी जंतसंसर्ग थांबविण्याकरिता हात स्वच्छ धुण्याचे प्रात्याक्षिक करुन घेतले, तसेच शौचालयाचा वापर करणे, पायात चपला किंवा बुट घालणे, निर्जंतुक आणि स्वच्छ पाणी पिणे, अन्न व्यवस्थित शिजवून खाणे, निर्जंतुक आणि स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धूणे, नखे नियमित कापणे तसेच शारीरिक स्वच्छता ठेवणे इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण देणे हा जंतसंसर्ग टाळण्याचा उपाय असल्याचे सांगून जंतनाशक गोळीच्या सेवनाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे उपस्थितांना सांगितले. यामध्ये जंतनाशकामुळे रक्तक्षय कमी होणे, आरोग्य सुधारणे, बालकांची वाढ भराभर होणे, अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढणे, शाळेतील उपस्थिती वाढणे, बालकाची आकलन शक्ती सुधारणे, दिर्घकाळ काम करणे आणि अर्थार्जनाची क्षमता वाढणे इत्यादी बाबींसाठी मदत होणार आहे.

 यावेळी कार्यक्रमास राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ. एस. एस. फुलारी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, कळंब तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिनगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. जी. पोतरे, प्रा. आ. केंद्र वालवड, भूम गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, केंद्र प्रमुख अंकुश उगलमुगले, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणूका राठोड, विस्तार अधिकारी आरोग्य वाळले, विशेष शिक्षक संजय कुलकर्णी यांच्यासह भगवंत विद्यालय हाडोंग्री येथील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी कर्मचारी, हांडोग्री येथील आरोग्य उपकेंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच इतर मान्यवर तसेच आरोग्य कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार पी. बी. यांनी केले तर आभार प्रदर्शन तळेकर सर यांनी केले.

 तसेच ही जंतनाशकाची गोळी सर्वांसाठी मोफत आणि प्रभावी असल्याने जिल्हयातील सर्व पात्र (एक ते 19 वर्षे वयोगटातील ) बालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


 
Top