उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सततच्या पडणार्‍या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सोयाबीन नुकसान भरपाईपोटी शासनाने मंजूर केलेले सोयाबीनचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे, यासाठी संबंधितांना सूचना करावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे. शेतकर्‍यांचे काढायला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सुरुवातीपासून सोयाबीन पिकावर सततचा पाऊस, गोगलगाय, एलोमोझॅक, खोडकिडा अशा विविध रोगांच्या आपत्ती होती. त्यामधून कसेबसे वाचलेले सोयाबीन काढणीस आले आहे. मात्र मागील दोन दिवसापासून पडलेल्या पावसामुळे सोयाबीन हातचे जाते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने घोषणा केल्याप्रमाणे अतिवृष्टी अनुदानातून जिल्ह्यातील मोजक्या महसूल सर्कलला अतिवृष्टी अनुदान मंजूर केले. परंतु जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळामध्ये सततच्या पावसाने शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शासनाने एक लाख 47 हजार 953 शेतकर्‍यांना खासबाब म्हणून 154 कोटी रुपये अनुदान मंजूर केले असल्याची घोषणा केली आहे. परंतु आजपावेतोपर्यंत शेतकरी वर्गाला अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल असून शासनाने मंजूर केलेले सोयाबीनचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याबाबत संबंधितांना सूचना करावी, अशी आग्रही मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी कृषी मंत्री सत्तार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


 
Top