उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सन 2022-23 चा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे जनरल मॅनेजर (टेक्नीकल) तानाजी गुंड व त्यांच्या सुविद्य पत्नी रेखा गुंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमास सुरूवात करण्यापूर्वी उपस्थित सभासदांचे स्वागत अ‍ॅड. चित्राव गोरे यांनी केले. आपल्या प्रस्ताविक भाषणात अ‍ॅड. चित्राव गोरे यांनी ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला ते जनरल मॅनेजर तानाजी गुंड हे गेल्या 23 वर्षांपासून कार्यरत असून, कारखान्याच्या प्रगतीचे साक्षीदार असल्याचे सांगितले. तसेच मागील हंगाम 220 दिवस चालवून 9.67 लाख क्रसिंग करण्यात आले. यावर्षी 180 दिवसांत 10.00 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने दैनिक 6300 मेट्रीक टन ऊस परवठा होणेसाठी यंत्रणा भरतीचे नियोजन करुन सरासरी दैनिक गाळप 5600 मे. टन करणेत येणार आहे. यावर्षी बेस्ट इफिसेन्सी महाराष्ट्रातील 10 टॉप कारखान्यात आपल्या कारखान्याचा नंबर येईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

कारखान्याचे जनरल मॅनेजर गुंड म्हणाले, कारखान्याच्या जुन्या आठवणींचा उजाळा देत कारखाना उभारणीपासून ते आजतागायत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांचे सिव्हील फाऊंडेशनपासून ते मशिनरी आधुनिकीकरण व विविध उपक्रमापर्यंत दुरदृष्टीकोनामुळे संस्थेस झालेल्या फायद्याचा दृष्टीक्षेप उपस्थितांसमोर मांडला. यावेळी बोलताना गुंड म्हणाले अरविंद गोरे यांचे जिद्द व कष्टामुळे हा कारखाना उभा असून, याचे नाव लौकिक केले आहे. येणार्‍या गाळप हंगामात सरासरी दैनिक 5600 मेट्रीक टन ऊस गाळप करणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच उभारणी काळात विशेष सहकार्य लाभलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकारी व विविध सल्लागार यांचे आभार मानले.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आपला कारखाना हा कोणत्या पक्षाचा, नेत्याचा नाही तर हा कारखाना सर्वसाधारण शेतकरी सभासद, कर्मचारी यांचा आहे. हा कारखाना सर्वाना एकत्र घेऊन सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून आज उभा आहे. तसेच कारखाना उभारणी काळापासून चंद्रपूर ते सिंधुदुर्गपर्यंत बँकांचे सहकार्य लाभले. कारखाना उभारणीपासून आजपर्यंत कारखाना व्यवस्थितरित्या चालविण्यासाठी अनेक अडचणी आल्या. परंतु, सर्वांच्या सहकार्याने संकटातून मार्ग काढत आपण हा कारखाना यशस्वीपणे चालवित आहोत. आपल्या कारखान्यात सुरूवातीला बंद कारखान्याचे कर्मचारी घेऊन कारखाना चालविला व नंतर कार्यक्षेत्रातील कर्मचारी भरती करून त्यांना प्रशिक्षित केल्याचे सांगितले. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी वाढीव इथेनॉल प्रकल्प व घाण पाण्याचे नियोजनासाठी सीपीयू असे नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. भविष्याचा वेध घेत पुढील काळात ज्युसपासून इथेनॉल निर्मिती व बायोगॅसपासून सीएनजी प्रकल्प उभारणीचे उद्दीष्ट ठेवले आहे. पुढे बोलताना कारखान्याचे संस्थापक चेअरमन यांनी कारखाना भूमीपूजन शेतकरी कर्मचारी हरिभाऊ पवार यांच्या हस्ते केले. आज 22 वर्षानंतर हिच परंपरा कायम ठेऊन कारखान्याचे जनरल मॅनेजर तानाजी गुंड यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आल्याचे सांगितले. कारखान्यांशी संलग्नित असलेल्या सर्व घटक यांच्या सहकार्यामुळे कारखान्याची पुढील बाटचाल यशस्वीपणे करू असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर कारखान्याचे संचालक अ‍ॅड.निलेश बारखडे पाटील यांनी उपस्थित संचालक मंडळ, सभासद, हितचिंतक, ऊस तोडणी ठेकेदार, पत्रकार व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.


 
Top