उस्मानाबाद (प्रतिनिधी) - 

अतिवृष्टी, सततचा पाऊस व पीक विम्याचे रक्कम सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे आ कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२४ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनास जिल्हा कमिटीच्यावतीने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला. या आंदोलनास शेतकरी व विविध संघटनांच्या पाठिंब्यांचा सपाटा सुरू झाला आहे.

आ. कैलास पाटील यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी करीत ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरु राहणार आहे.

आज उपोषणस्थळी आ.पाटील यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, मानवाधिकार जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते कृष्णा तवले, राम कदम, प्रदीप बप्पा घुटे, अशोक बनसोडे, शहर उपाध्यक्ष आरेफ मुलाणी, सुनील बडूरकर, विद्यार्थी काँग्रेसचे सौरभ गायकवाड, अशोक पेठे, हज्जू शेख हे काँग्रेसच्या शिष्टमंडळात सहभागी होते.

शेतकरी संकटात व दुःखात असल्याने मी दिवाळी शेतकऱ्यांसोबत उपोषण स्थळी करणार असून खराब झालेल्या सोयाबीनच्या काडाचे लक्ष्मी पुजन केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन २०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. या रकमेत कोणतीही कपात करण्यात येऊ नये.

सन २०२०-२१ च्या पीक विम्याची उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयाची रक्कम ही विमा पात्र ६ लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे. सप्टेंबर २०२२ मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी डगफुटी रोगराईमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी २४८ कोटी रुपये २ लाख ४८ हजार ८०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे. चालू खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी ढगफुटी पिकावरील रोगराईमुळे संपूर्ण पिके आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा. पीडित शेतकऱ्यांना जीव घेण्या आर्थिक संकटातून दिलासा द्यावा. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आजपर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे १२०० कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या मागण्यांसाठी आ.पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यास आज महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन उस्मानाबाद जिल्ह्यात आगामी काळात महाविकास आघाडी एकजुटीने काम करणार हा संदेश दिला आहे.

 
Top