हा नराधम समाजात राहण्याच्या लायकीचाच नाही

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील एका ६ वर्षीय इतक्या लहान वयामधील चिमुकलीवर झालेला अत्याचार अत्यंत निंदनीय आहे.  ही दुर्दैवी घटना असून यापूर्वी या व्यक्तीला ३७६ कलमान्वये ६ वर्षाची शिक्षा झालेली होती. तर ३५९ कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. हा गुन्हेगार लैंगिक गुन्हे करण्यात सराईत असल्याने तो समाजात राहण्याच्या लायकीचाच नाही. त्यामुळे राज्य महिला आयोगाने त्यास फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दि.२ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील एका ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कारमध्ये सराईत असलेल्या गुन्ह्यागाराने जबरी बलात्कार केला आहे. त्या चिमुकलीवर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्या बालिकेच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैशालीताई मोटे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय पाटील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. स्मिता गवळी-सरोदे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, ऍड मनीषा राखुंडे, अनिता गरड, बाल कल्याण समितीच्या सदस्या कुदळे, भोसले, जहागिरदार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याचा तत्परतेने तपास पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून १५ दिवसांच्या आत चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येणार असून त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल या दृष्टीने पावले उचलण्यात येतील. पिडीतेला न्याय देण्यासाठी महिला राज्य आयोग प्रयत्नशील असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तपासामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. तसेच आरोपीचा मोबाईल पोलिसांना सापडलेला असून त्याच्या मोबाईलमध्ये बलात्कार करतानाचे चित्रीकरण रेकॉर्डिंग केले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात अपहरण, बलात्कार यासह आयटी कायद्याखाली नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्याखाली ६ वर्षाची शिक्षा भोगून आलेला आहे. तर कलम ३५४ च्या गुन्ह्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे. त्यामुळे तो आरोपी क्रूर असल्याचे सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

 
Top