उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लंपी स्किनचा प्रादुर्भाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 62 जनावरे यामुळे बाधित झाले आहेत. यावर त्वरीत उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. जिल्ह्यात 100 टक्के गोजातीय जनावरांचे लसीकरण युध्द पातळीवर करुन घ्या, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे आयोजित आढावा बैठकी प्रसंगी डॉ.सावंत बोलत होते. 

              यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुनिल पसरटे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी, पीकविमा, महावितरण, पशुसंवर्धन, भुमी अभिलेख आणि कृषी विषयक बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

             सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात लंम्पी रोगाच्या साथीमुळे गाय आणि म्हैस सारख्या पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. पशुधन हा शेतकऱ्यांचा आत्मा असतो. त्यांना वाचविण्यासाठी शासनाकडून मोफत लसीकरण केले जात असून आतापर्यंत जिल्ह्यात एकही गोजातीय पशु लंपीमुळे दगावले नाही. तसेच 62 पैकी 20 पशु पूर्ण बरे होत आहेत आणि उर्वरित जनावरेही लवकरच बरे होतील. तेंव्हा पशु पालकांनी घाबरु नये, तसेच बाधित जनावरांची माहिती पशुसंवर्धन विभागास वेळेत द्यावी, असे आवाहनही डॉ.सावंत यांनी केले.

              यावेळी शेतकऱ्यांना विमा कंपन्याडून होणाऱ्या त्रासाबद्दल डॉ.सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना वयाचा दाखला मागणे आणि वयस्कर शेतकऱ्यास विमा योजना नाकारणे ही बाब अनुचित असल्याचे ते म्हणाले. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे, त्यांच्या सिबील स्कोअर पाहणेही योग्य नसल्याचे मंत्री महोदय यावेळी म्हणाले. बँकानी दत्तक घेतलेल्या गावांना तेथील शेतकऱ्यांना सबंधित बँकांची यादी पाठवावी. शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ होईल. तसेच कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना कर्जाची पूर्ण रक्कम एकाच वेळी त्यांच्या खात्यात जमा करावी. जेणेकरुन त्या पैशांचे योग्य नियोजन शेतकरी करु शकतील. 

               यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही मंत्री महोदयांनी वीज वितरणासंबंधी आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांना आवश्यक त्या वेळेत आणि आवश्यक त्या प्रमाणात वीज पुरवठा कसा करता येईल याचे योग्य नियोजन करण्यात यावे. जेणे करुन शेतकऱ्यांना शेती उत्पादनात नक्कीच फायदा होईल. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आपल्या कार्यालयातील सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना केली. पुढच्या आढावा बैठकीत याबाबतचा झीरो पेंडेंसी अहवाल अपेक्षित असणार असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

 
Top