उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हयामध्ये १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जिल्हा समन्वय समिती व जिल्हा टिबी फोरम समितीची बैठक  जिल्हाधिकारी दिवेगावकर  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मोहिमेमध्ये ग्रामिण भागातील सर्व व शहरी भागातील निवडक घरी आरोग्य पथक येणार असून त्या पथका मार्फत क्षयरोग व कुष्ठरोगा संबंधी तपासणी होणार आहे.

 क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून निदान न झालेला थुंकि दुषित क्षयरुग्ण एका वर्षात १५ -१६ जणांना क्षयरोगाची लागण करु शकतो. क्षयरुग्णांच्या घरातील तसेच निकट संपर्कातील व्यक्तींना या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता असते. विशेषतः रुग्णाच्या संपर्कातील लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला यांना या रोगाची लागण होऊ शकते. त्यामूळे क्षयरोगाचा समाजात होणारा प्रसार वेळेत रोखण्यासाठी या रोगाची लक्षणे (दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा ताप,वजनात घट, थूंकि वाटे रक्त येणे, मानेवरती किंवा काखेत गाठी असणे इ.) असणाऱ्या व्यक्तिंनी येणाऱ्या पथकास माहिती देवून तपासणी करुन घ्यावी. सदरील तपासणी मध्ये थूंकि तपासणी व एक्स-रे शासकिय दवाखान्यात मोफत केले जातात व मोफत उपचार दिला जातो. संशयीत क्षयरुग्ण चाचणी जिल्हयात सर्व उपजिल्हा रुग्णालय,ग्रामिण रुग्णालय , निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध असून जिल्हयात ४ नविन सिबीनॅट मशिन्स व ५ नविन ट्रूनॅट मशिन्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामूळे जिल्हयातील सर्व जनतेने या मोहिमेचा लाभ घेवून घरी येणाऱ्या पथका मार्फत लक्षणे असल्यास तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.

यावेळी नविन क्षयरुग्ण निदान तसेच उपचार यामध्ये जिल्हयातील खाजगी वैद्यकिय व्यवसायीक तसेच औषध विक्रेते यांचा हि सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे व शासनाच्या राजपत्रानूसार नविन क्षयरुग्णाची नोंदणी करणे बंधन कारक असल्याचे प्रतिपादन मा.जिल्हाधिकारी यांनी केले. क्षयरोगाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हयातील सामाजिक संस्था, रोटरी क्लब, वैद्यकिय क्षेत्रातील विविध संस्था, उद्योग समूह यांनी निक्षय मित्र म्हणून श् प्रधानमंत्री टिबी मूक्त भारत अभियानश् मध्ये सहभाग नोंदवावा तसेच उपचाराखालील क्षयरुग्णांना अतिरीक्त पोषण आहाराची मदत करुन क्षयरोग मुक्तीसाठी हातभार लावावा असे आवाहन मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत करण्यात आले. निक्षय मित्र म्हणून नोद करण्यासाठी इच्छूकांनी जिल्हा क्षयरोग कार्यालयाशी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा ई-मेल (dtomhobd@rntcp.org) द्वारे संपर्क साधावा. सदर अभियानामध्ये उस्मानाबाद रोटरी क्लब मार्फत शहरातील उपचाराखालील १० क्षयरुग्णाना अतिरीक्त मदत उपलब्ध करुन देण्यासाठी डॉ. सचिन देशमूख यांचे जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले.

 या बैठकिसाठी मूख्य कार्यकारी अधिकारी राहूल गूप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के पाटिल, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकूमार हलकूडे माता व बालसंगोपण अधिकारी डॉ.कूलदिप मिटकरी , निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.सुशिल चव्हाण , आय एम ए अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख खजगी वैद्यकिय व्यवसायीक प्रतिनिधी डॉ.प्रविण डूमणे, डॉ विवेक होळे उपस्थित होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अन्सारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
Top