उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात निर्यात वृद्धी, उद्योग विषयक गुंतवणूक वृद्धी, एक जिल्हा एक उत्पादन आणि व्यवसाय सुलभीकरण (EODB)एकदिवसीय निर्यात  कार्यशाळा अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.  तसेच जिल्हयातील उत्पादीत निर्यातक्षम मालाचे एकदिवसीय प्रदर्शनास भूम येथील गारमेन्ट क्लस्टर, उस्मानाबाद तालुक्यातील फॅब्रिकेशन क्लस्टर, लेदर क्लस्टर, कुंभार क्लस्टर,गौर येथील वेदांकुर इंडस्ट्रीज, पाडोळी येथील रूपामाता मिल्क अँड जॅगरी प्रॉडक्ट,बेंबळी येथील नामानंद फूड प्रॉडक्ट, जागजी येथील सावंत ड्रॅगन फूड, माय गारमेन्ट,आयुष इंडस्ट्रीज, सन्मती फूड प्रोडक्टस,जानकी आणि अवंती महिला बचत गट इत्यादी उद्योजक हजर होते.

 या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक पी.डी.हणबर यांनी केले. या कार्यशाळेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रदर्शनास भेट देवून पाहणी केली तसेच निर्यात संबंधी अडीअडचणीबाबत विचारणा केली आणि सविस्तर असे निर्यात वाढीसाठी मार्गदर्शन केले.

 यावेळी औरंगाबाद विभागाचे उद्योग सहसंचालक बी.टी.यशवंते यांनी जिल्ह्यातील उद्योगांचा आढावा घेऊन शासन स्तरावर उद्योगांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, क्लस्टर याबाबत माहिती दिली. द्राक्ष निर्यातदार शेतकरी फंड यांनी निर्यातीत येणा-या अडीअडचणी मांडल्या, सीताफळ निर्यातदार उद्योजक नवनाथ कस्पटे यांनी सीताफळ निर्यातीत येणा-या अडीअडचणी मांडल्या. कृषी उपसंचालक श्री.काशीद,  निर्यात सल्लागार कांचन कुलकर्णी, कृषी निर्यात तज्ज्ञ डॉ. गोविंद हांडे, मैत्री कक्ष एस.एल.कुंभलवार, एस.बी.आय.चे सहाय्यक महाप्रबंधक विलास शिंदे, मुख्य सल्लागार मिटकरी, लातूर येथील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक  पळणीटकर, बालाजी अमाईन्सचे निर्यात व्यवस्थापक अमित महंत यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून निर्यात विषयक तज्ञांनीही यावेळी  मार्गदर्शन केले.

 कार्यशाळेमध्ये निर्यात विषयक जिल्हयातील प्रमुख निर्यातदारांनी आपले अनुभव सांगितले.  त्यामध्ये निर्यात प्रक्रिया, दस्तऐवज नियम, प्रोत्साहन, निर्यात करणे सोपे कसे होईल आणि केंद्र शासनाकडून मिळणा-या सवलती याबाबत तज्ज्ञ सल्लागार कांचन कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  EODB आणि  मैत्री कक्ष बाबत एस.एल.कुंभलवार यांनी मार्गदर्शन केले.  कृषी क्षेत्रातील निर्यात संधीचे सादरीकरण आणि जिल्हानिहाय उत्पादनांशी संबंधित EPCS द्वारे निर्यात प्रोत्साहनासाठी क्षेत्र आणि समर्थन बाबत तंत्र कृषी सल्लागार डॉ. गोविंद हांडे  यांनी मार्गदर्शन केले. “एक जिल्हा एक उत्पादन” बाबत आणि कृषी उत्पादन निर्यात बाबत कृषी उपसंचालक काशीद यांनी मार्गदर्शन केले. एक जिल्हा एक उत्पादन जिल्हयासाठी गुंतवणूक प्रोत्साहन धोरण बाबत सादरीकरण आणि माहिती मुख्य निर्यात सल्लागार मिटकरी, निर्यातक्षम उद्योगासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत एस.बी.आय.चे मुख्य व्यवस्थापक पळणीटकर यांनी मार्गदर्शन केले.

 या कार्यशाळेसाठी उद्योग संघटनांचे संजय देशमाने, निशांत होणमुटे, सोमनाथ साबळे, धनराज टीकबरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि या कार्यशाळेत निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, निर्यातदार तसेच प्रगतीशील शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य शासनाचे अधिकारी, निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात विषयक कामकाज करणारे सर्व घटक, व्यापारी, बँका इ. यांनी या कार्यशाळेसाठी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. एन.पी. जावळीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
Top