न्यायालयीन कुरघुड्या बंद करा, तेरणा सुरु करा

उस्मानाबाद  (प्रतिनिधी) - तालुक्यातील ढोकी येथील मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठा असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. मात्र या टेंडर प्रक्रियेवरून भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. न्यायालयात प्रलंबित असून या बाबत ट्वेंटीवन शुगरचे आ. अमित देशमुख व भैरवनाथ शुगरचे मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी न्यायालयाबाहेर आपसात तडजोड करावी व हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा. तसेच न्यायालयीन कुरघुड्या बंद करा व तेरणा सुरु करा या एकमेव मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने आ. देशमुख यांच्या बाभळगाव येथील गढीसमोर व मंत्री सावंत यांच्या माढा येथील घरासमोर दि.२२ व २३ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य ऍड अजित खोत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तेरणा कारखाना संदर्भात माहिती देण्यासाठी येथील दिशा पतसंस्थेच्या इमारतीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, तालुकाध्यक्ष राजपाल देशमुख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ऍड. खोत म्हणाले की, तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची भैरवनाथ शुगरची निविदा जिल्हा सहकारी बँकेने मंजूर केली. या विरोधात ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात धाव घेतली. न्यायालयाने निकाल तात्काळ देण्याऐवजी विलंब केल्यामुळे भैरवनाथ शुगरने वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून शेतकरी, कारखान्याचे सभासद, व्यापारी व त्यावर अवलंबित्व असलेल्यांच्या  हितासाठी हा कारखाना सुरू होणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे. मात्र देशमुख व सावंत यांच्या न्यायालयीन लढ्यामुळे हा कारखाना सुरू होत नाही. आजपर्यंत न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्यातील अनेक कारखाने कायमस्वरूपी बंद पडले आहेत असे सांगत ते म्हणाले की, या कारखान्याची अवस्था तशी होऊ नये यासाठी आम्ही सर्व स्तरावर प्रयत्न करणार आहोत. देशमुख व सावंत यांनी न्यायालयीन लढा संपवावा व आमचा कारखाना सुरू करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. त्याबरोबरच हा कारखाना सुरू करावा यासाठी शेतकरी, सभासद, व्यापारी व त्यावर अवलंबित्व असलेल्या सर्वांची स्वाक्षरी मोहीम राबवून त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. तसेच यासाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून एकही स्टेटमेंट देखील दिलेले नाही. खा. राजेनिंबाळकर व आ. पाटील यांचे कुटुंबिय तेरणा कारखाना चालवीत होते. त्यांनी कारखान्याची पदे देखील भूषविलेली आहेत. मात्र हा कारखाना चालू व्हावा यासाठी एकजण देखील प्रयत्न करीत नाही किंवा त्यांची तशी मानसिकता नसल्याची टीका त्यांनी केली

-- --

खा. राजेनिंबाळकर यांनी या कारखान्याच्या सरकारने घेतलेल्या थक हमीपोटी २० कोटी रुपये निधीस मान्यता दिली असल्याचे सांगितले होते. मात्र त्यापैकी एक रुपया देखील जिल्हा बँकेस प्राप्त झालेला नाही. 

-- -- -

आ. राणाजगजितसिंह पाटील हे आघाडी सरकार असताना सरकारने घेतलेल्या थकमीची रक्कमेची वारंवार मागणी करत होते. तसेच याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवावी अशी मागणी देखील करीत होते. मात्र आता सत्ता बदल झाले असून गेल्या २-३ महिन्यांपासून त्यांनी याबाबत बैठक लावली नाही किंवा निधीची मागणी देखील केलेली नाही, असा आरोपही ऍड. खोत यांनी केला.

 
Top