उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पाणी एक अनमोल संपदा मानली जाते. पाण्याचा सुयोग्य वापर करणे आणि थेंब अन्‍ थेंबाची साठवण करुन “कॅच द रेन” हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहयोग करावा तसेच देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा घ्या, असे आवाहन निती आयोगाचे उप-सचिव तथा केंद्रीय नोडल अधिकारी सुशिल इक्का यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे केंद्र शासन पुरस्कृत जल शक्ती अभियान या कार्यक्रमांतर्गत “कॅच द रेन” अंतर्गत आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम.डी.तीर्थकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी सी.के.कलशेट्टी, यु.डी.ब्रांचचे जिल्हा सहआयुक्त सतिश शिराणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.आर.पडवळ, कनिष्ठ भूवैज्ञानिक आर.बी.शेट्टे, मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे आदी उपस्थित होते.

 श्री.इक्का पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी प्रतिज्ञा करावी, मी माझे कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांना पाण्याचा सुयोग्य वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत प्रेरित करेल. तसेच त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करेल अशी प्रतिज्ञा प्रत्येक नागरिकाने घेतल्याने हे जलशक्ती अभियान यशस्वी होऊ शकते. ही वसुंधरा आपली आहे. आपणच या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

 जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.कलशेट्टी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जलशक्ती अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा सादर केला. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जलविकास, जलसंपदा, जलपुनर्भरन, विहीर पुनर्भरण, बोअरवेल पुनर्भरण याबाबत जागरुकता निर्माण केली.

 श्री.कलशेट्टी म्हणाले की, जलपुनर्भरण आणि जलसंधारणाची कामे करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच नवीन बंधारे बांधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. याचबरोबर छोटे तलाव आणि विहिरींचही दुरुस्ती करण्यात आली आहे.

 जलशक्ती अभियान “कॅच द रेन” अंतर्गत अमृत सरोवर अभियानही राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात 75 सरोवर बांधण्यात येत आहेत. प्रत्येक सरोवराचा आकार एक एकर असून 10 हजार क्युनिक मीटर पाणी साठवण्याची त्यात क्षमता असेल. या 75 सरोवरांपैकी 46 सरोवरांची कामे पूर्ण झाली असून लवकरच उर्वरित सरोवरांची कामे पूर्ण होतील, असे श्री. कलशेट्टी यावेळी म्हणाले.


 
Top