उमरगा / प्रतिनिधी-

  यश प्राप्त करणे ही बहुतेक सर्वांच्या आयुष्यातील मोठी आकांक्षा असते .मात्र कुठल्या कृतीने आपल्याला शाश्वत यश मिळते यासाठी यशस्वी प्रवासाची आधारभूत तत्वे समजून घ्यायला हवीत .जोपर्यंत तुम्ही आयुष्यात एक निश्चित ध्येय ठरवत नाही , तोपर्यंत तुम्ही तुमचे सर्वोत्तम साध्य करू शकत नाही असे मत सुप्रसिद्ध निवेदक तथा प्रेरणादायी वक्ते भैरवनाथ कानडे यांनी व्यक्त केले.

उमरगा येथील भारत विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रीगणेश व्याख्यानमालेत साहवे पुष्प गुंफताना “ मी यशस्वी होणारच “ ..! या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव तर प्रमुख मान्यवर म्हणून पर्यवेक्षक विक्रांत मोरे , संजय देशमुख , व माने यांची उपस्थिती होती .पुढे बोलताना कानडे म्हणाले की , ‘ विद्यार्थ्यांनी शालेय वातावरणात आपल्या जीवनाचे ध्येय ठरविताना आपणाला झेपतील अशी पण उंच व वास्तववादी स्वप्न पहावीत , आणि ती पुर्ण करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करायला हवा . मोठ्या स्वप्नांची वाट ही तितकीच खडतर व संघर्षमय असते .समोर संकटाच्या मालिका उभ्या असताना त्या सोडविण्यासाठी दृढ इच्छाशक्ती ,खडतर परिश्रम , जाज्वल आत्मविश्वास ,यशस्वीतेसाठी आवश्यक सदगुण , सकारात्मक दृष्टिकोन , कल्पनाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर सतत प्रयत्नवादी राहिल्यास प्रत्येकाला यशाचं गौरी शिखर गाठता येतं. गुरुंच्या सहवासात आणि पुस्तकाच्या सान्निध्यातच उत्तुंग स्वप्न भेटतात . ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाचा मेरु उभा करा . असेही त्यांनी सांगितले . यावेळी शाहूराज जाधव यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशस्वी व्यक्तिमत्त्वाची उदाहरणे दिली व त्यांचा आदर्श व ते व्यक्तिमत्व कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.  यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण माने , सहशिक्षक व्यंकट गुंजोटे , दुधाराम क्षीरसागर , अभिजीत पाटील , संजय ढोणे , व्यंकटेश पाटील यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देशमुख यांनी तर सूत्रसंचालन नंदा वडदरे यांनी केले. किरण माळी यांनी आभार प्रदर्शन केले.


 
Top