उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील ग्रामीण स्तरावर ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्याचे संबंधितांना आदेश देऊन विविध कल्याणकारी योजना मिळवून द्याव्यात, तसेच साखर कारखाना स्तरावर अपघाती मृत्यू पावलेल्या ऊसतोड कामगाराच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाखाची आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेने केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे.

 साखर उद्योगा महाराष्ट्राचा नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मांडला जातो. याच उद्योगात काबाडकष्ट करणार्‍या ऊसतोड कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु अद्याप या कामगारांना त्यांच्या कष्टाच्या प्रमाणात काही मिळालेले नाही. या कामगारांच्या शासन स्तरावर नोंदणी नसल्याने ऊसतोड कामगारांना आणि त्यांच्या पाल्यांचे जीवन हलकीचे आणि असुरक्षिततेचे जगावे लागत आहे. या कामगारांची नोंदणी शासन स्तरावर झाली नसल्याने शासनाकडून मिळणार्‍या विविध कल्याणकारी योजनेपासून हे कामगार वंचित राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा हा प्रमुख व्यवसाय असल्याने यांची मुले मुली याच व्यवसायाकडे वळल्याने त्यांचे जीवनमान उंचावलेले नाही आणि ते शिक्षणापासून ही वंचित राहिलेले आहेत. महाराष्ट्रात खाजगी आणि सरकारी तत्त्वावर कार्यरत असणार्‍या साखर कारखान्याची संख्या 300 पेक्षा जास्त आहे.या ठिकाणी ऊसतोड करणारे कामगारांची संख्या सरासरी 14 ते 15 लाख कामगार कार्यरत आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे अशा उस्मानाबाद, लातूर, नांदेड औरंगाबाद, जळगाव, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी या जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वसतिगृहत देण्यात आलेले नाही. यामुळे या जिल्ह्यातील गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या मुलावर आभाळ कोसळल्यागत झालेले आहे.  या कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक लाभ, विविध कल्याणकारी योजना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, यांना आदेश होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 निवेदनावर तुळजाभवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पवार, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राजू पवार, उमरगा तालुकाध्यक्ष प्रताप राठोड आदींची स्वाक्षरी आहे. 

 
Top