उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टी व सततच्या पावसानक नुकसान झाले आहे. ते अनुदान शेतकर्‍यांना त्वरित मिळावे, तसेच शेतकर्‍यांना सरसगट 50 हजार हेक्टरी अनुदान देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी (दि.19) दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2022 महिन्यापर्यंत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन या मुख्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीन या पिकावर सुरुवातीला पावसामुळे नंतर गोगलगायीमुळे व नंतर येलो मोजक, खोड आळी, चक्रीभुंगा व तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे 50 टक्के पेक्षा जास्त शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यामध्ये 4 लाख 54 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे यामध्ये जवळपास तीन लाख 25 हजार हेक्टरवरील सोयाबीन उध्वस्त झालेले आहे. शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुके व तिसर्‍या तालुक्यातील दोन महसूल सर्कल यास 90 कोटी रुपये मंजूर केल्याचे ऐकीव आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र 439 कोटी रुपये शासनाकडून मिळणे अपेक्षित असताना 90 कोटी रुपयांवर शेतकर्‍यांच्या अनुदानाची बोळवण केली जात आहे. शेतकर्‍यांची आर्थिक विवंचना थांबविण्यासाठी त्यांना ताबडतोब हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


 
Top