उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. युवक युवतीसह सेवाभावी संस्था, विविध जाती धर्मातील प्रतिष्ठित नागरिक व महिलांनी यामध्ये उत्सफुर्त सहभाग नोंदविला.

 शोभा यात्रेत अनेक समुदाय पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. विविध योजनांचे फलक, राष्ट्रीय नेते आणि समाज सुधारकांचे छायाचित्र, वाद्य पथक आणि विविध देखावे या शोभा यात्रेत पाहायला मिळाले. जिजाऊ चौक येथून आमदार राणाजगजितिसंह पाटील  यांच्या शुभ हस्ते ढोल ताशांच्या गजरात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीते व भारत मातेच्या जयघोषाणे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सुमारे दहा हजार विद्यार्थी ७५७५ फुट लांबीचा तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. उंट, घोडे व मोटार सायकलवर स्वार पारंपारिक वेशातील महिलांचा सहभाग लक्षवेधी होता.

   यावेळी सत्यभामा शिंदे हायस्कुल, जिवनराव गोरे विद्यालय, नुतन विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कुल, शरद पवार हायस्कुल, आसरा उर्दु हायस्कुल, तेरणा पब्लीक स्कुल, श्री रविशंकर हायस्कुल, आर पी कॉलेज, भारत विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, अभीनव इंग्लीश स्कुल, जि.प.मुलांची शाळा, तेरणा हायस्कुल, समता माध्यमिक विद्यालय, सरस्वती हायस्कुल, जि.प.कन्या प्रशाला, ग्रिनलॅन्ड शाळा, भगीरथीबाई लाटे प्रशाला, भाई उध्दवराव पाटील शाळा, आर्य चाणक्य विद्यालय, श्रीपतराव भोसले हायस्कुल आदींनी यात सर्कीय सहभाग नोंदविला. व्यापारी महासंघ व त्यांच्या प्रतिनिधींनी शोभा यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांसाठी पाणी व्यवस्था केली होती.

 छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिलांचे मर्दानी खेळ साजरे करुन राष्ट्रगीताने शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. धाराशिव करांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा अभुतपूर्व भव्य दिव्य दिमाखदार सोहळा हवेत तिरंगी फुगे सोडुन उस्मानाबाद करांच्या उत्सर्फुत सहभागाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेल्या व सहभागी झालेल्यांचे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आभार व्यक्त केले.


 
Top