परंडा / प्रतिनिधी - 

परंडा तालुक्यातील पांढरेवाडी गावच्या रस्त्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे एक ना अनेक वेळा मागणी करत निवेदन दिली.मात्र याची कोणतीच दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी निम्नखैरी प्रकल्पात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

  प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुनर्वसनाच्या कोणत्याच नागरी सोयी सुविधा न देता गावाचे पुनर्वसन केले.चालू असलेल्या आंदोलन स्थळी कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी येऊन प्रशासनाची काय भूमिका असेल ती मांडली नाही, जलसमाधी आंदोलनाची दखल घेतली नाही.

सुमारे २५०-३०० आंदोलकांपैकी ४०-५० पुरुष व महिलांनी  आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष पाण्यात उतरून आंदोलन केले.यांमध्ये ६७ वर्षांच्या जेष्ठ आज्जी सुमनबाई आजिनाथ भिल्लारे यांना त्रास झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव येथे प्राथमिक आरोग्य अधिकारी  डॉ.सूरज लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

काल प्रत्यक्ष आंदोलनस्थळी न येता ठरावीक लोकांचीच भेट घेऊन सकाळी ८ वा. कामाला सुरवात होईल असे आश्वासन तालुक्याचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी दिले होते.परंतू प्रत्यक्ष दुपारी ३ वाजेपर्यंत काम चालू झाले नाही ना काम करण्यासाठी कोणती तयारी केली गेली.अथवा जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी  तहसीलदार,नायब तहसीलदार असे जबाबदार अधिकारी किंवा जनतेने निवडून दिलेले  लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनस्थळी पाऊल ठेवले नाही.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन होऊन त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे २५ नागरी सोयी  सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते.यांमध्ये स्मशानभूमी,  आरोग्य, वीज, शुध्द पाणी पुरवठा,स्वस्त धान्ये दुकान,पोस्ट ऑफिस,वाचनालय,खते,धान्ये साठवण गोदामे यासारख्या सोयी सुविधां अगोदर उपलब्ध करून देऊन नंतरच गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे होते यातील कोणत्याच सुविधां अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.

रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट आहे.गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहन धारकांना , आजारी रुग्णांना व शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तात्काळ करा. ही मागणी घेऊन ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान जोपर्यंत रस्त्याविषयी ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत जलसमाधी आंदोलनातून माघार नाही.असा पवित्रा आंदोलक ग्रामस्थांनी घेतला आहे.

 
Top