उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या दुफळीनंतर कट्टर सामान्य शिवसैनिक दुखावले आहेत. यातूनच धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील कट्टर शिवसैनिकाने आपली पक्षनिष्ठा अनोख्या पद्धतीने प्रकट केली आहे. वाशी ते मातोश्री असा साडेचारशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर करुन आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा संदेश वाशी येथील नितीन सुकाळे यांनी दिला आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सुकाळे यांच्या अनोख्या पक्षनिष्ठेचे कौतुक करुन शिवसैनिक हाच पक्षाचा श्वास असल्याचे सांगितले.

 महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कोरोनाकाळात मुख्यमंत्रीपदावर असताना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी अतिशय कुशलतेने परिस्थिती हाताळून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन त्यांनी सर्वसामान्यासोबत शिवसेना असल्याचे दाखवून दिले. परंतु जुलै महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर सामान्य शिवसैनिक पेटून उठला आहे. शिवसेनेची नव्याने बांधणी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्याची तयारी ठेवून नव्या जोमाने शिवसैनिक कामाला लागले आहेत. याच उर्मीतून धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील शिवसैनिक नितीन सुकाळे यांनी वाशी येथून सायकलवरुन थेट मातोश्री गाठण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून प्रवास सुरू केला. मजल-दरमजल करीत सायकलवरुन साडेचारशे किलोमीटर अंतर कापून ते 5 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाले. सायंकाळी वाशी तालुक्याचे भूमिपुत्र असलेले शिवसेना नेते तथा उद्योजक शंकरराव बोरकर यांच्या निवासस्थानी मुक्काम करुन   मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे यांच्या भेटीस दाखल झाले.

 नितीन सुकाळे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून वाशी तालुक्यात सेंट्रींगची कामे करुन उदरनिर्वाह चालवितात. सामान्य शिवसैनिकाचे पक्षावरील प्रेम पाहून उपस्थितांना गहिवरुन आले. श्वास असेपर्यंत आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सुकाळे यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, कट्टर शिवसैनिक नितीन सुकाळे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज बाळासाहेब मालुसरे, मुंबई बोरिवली शिवसेना शाखा प्रमुख अमोल बोरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top