उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील जेष्ठ नागरिक व दिव्यागांना आवश्यकतेनुसार मोफत उपकरणे देण्याची योजना राबविण्यात येत असून,जिल्ह्यात या महत्त्वाकांक्षी योजनेच्या शिबीराचे तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ११ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील वयोमानानुसार दिव्यांगत्व आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेंतर्गत व दिव्यागांना सहाय्यक उपकरणे (ADIP) योजनेअंतर्गत वैद्यकीय तपासणी आधारे विविध उपकरणे दिली जाणार आहेत. यामध्ये चालण्यासाठी काठी, कृत्रिम दात, कवळी,श्रवणयंत्र, व्हीलचेअर, ट्रायपॉड, एलबो क्रचेस, मोटाराईज्ड ट्रायसिकल, सिपी चेअर, ब्रेल किट, टॅबलेट, रोलाटर, स्मार्ट फोन, ब्रेल केन,अडल्ट किट,अडल्ट फोन, एम.आर.किट आदी उपकरणांचा समावेश आहे.

शिबीरामध्ये अस्थिव्यंग,अंध, मतिमंद व मुकबधिर लाभार्थ्याची तपासणी करुन पात्र लाभार्थ्यांचे आवश्यक उपकरणांचे मोजमाप घेण्यात येणार असून त्यांना आवश्यक असणारे कृत्रिम साहित्य भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) यांच्यामार्फत तयार करून तद्नंतर स्वतंत्र कार्यक्रम घेवून वाटप करण्यात येणार आहे. वयोश्री व ADIP योजनेच्या प्रत्येकी ५००० लाभार्थ्यांना मोफत उपकरणे देण्यात येणार आहेत.

कृत्रिम साहित्याची आवश्यकता असलेल्या दिव्यांग व जेष्ठ लाभार्थ्यांनी आधारकार्ड, ४० टक्के दिव्यांग असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र (केवळ दिव्यांगासाठी), १ लाख ८० हजार रूपयांच्या आतील वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र, २ पासपोर्ट फोटो घेऊन शिबिराच्या ठिकाणी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना मदत करणे हे पुण्यकर्म आहे. सर्व गरजूंपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह सामाजिक संघटना, सरपंच व इतर लोकप्रतिनिधी, यांनी पुढाकार घेत गरजूंना शिबिरापर्यंत आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.


 
Top