उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी आणि जाणीव जागृतीसाठी दि.13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 08.00 वा. उस्मानाबाद शहरामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे प्रभात फेरी आणि सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या प्रचार प्रसिध्दीमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

 या प्रभात फेरीमध्ये शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांचे एनसीसी, एनएसएस, स्काऊट अॅन्ड गाईडच्या विद्यार्थ्यासह इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच सायक्लोथॉनमध्ये शहरातील उस्मानाबाद मॅरोथॉन ग्रुप, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद आणि अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहारातील पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

 या दोन्ही कार्यक्रमास  श्री दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, उस्मानाबाद येथून सुरुवात होणार आहे.

 प्रभात फेरीचा मार्ग क्रीडा संकुल- समता नगर - जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक- क्रीडा संकुल असा राहील. सायक्लोथॉन कार्यक्रमाचा मार्ग क्रीडा संकुल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक संत गाडगे महाराज चौक, जिल्हाधिकारी निवासस्थान चौक - काळा मारुती चौक-ताजमहल टॉकीज चौक- शासकीय आर्युवेदिक महाविद्यालय चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रीडा संकुल असा राहील. कार्याक्रमाची सांगता क्रीडा संकुल येथे होणार आहे.

 
Top