उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी व विशेषतः सतत पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना दि.०१.०८.२०२२ रोजी सूचना दिल्या होत्या. तरी देखील तालुकास्तरीय यंत्रणेकडून आजपर्यंत केवळ ५४.८४% पंचनामे झाले आहेत. मात्र उर्वरित प्रक्रिया ४ दिवसांत पूर्ण करून जिल्ह्याचा अहवाल देण्याचा शब्द जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

या अहवालावर राज्य सरकारला खास बाब म्हणून नैसर्गिक आपत्ती जाहीर करत अतिवृष्टीच्या नविन निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित क्षेत्र अंदाजे १५६००० हेक्टर असल्याची प्राथमिक माहिती कृषी व महसूल यंत्रणेने दिली आहे. यापैकी अंदाजे ८५००० हेक्टरचे पंचनामे करण्यात आलेत. वास्तविक पाहता जुलै २०२२ मध्ये अनपेक्षित असा सततचा पाऊस अनेक दिवस होता. यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या. स्थायी आदेशातील निकषांच्या पलीकडे जावून नुकसानीचा वास्तववादी अहवाल राज्य सरकारकडे पाठविणे गरजेचे होते. काल उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अंदाजे ५५% पंचनामे झाले असून उर्वरित ४५% पंचनामे येत्या ४ दिवसांत पूर्ण करून जिल्ह्याचा अहवाल राज्य शासनाकडे देण्याचा शब्द महेश तीर्थकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिला आहे. जेणेकरून या अहवालावर राज्य सरकारला खास बाब म्हणून नैसर्गिक आपत्ती जाहीर करत अतिवृष्टीच्या नविन निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देणे क्रमप्राप्त राहील.

बाधित झालेल्या क्षेत्राचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून घेण्याची जबाबदारी संबंधित शेतकरी भगिनी व बांधवांवरती देखिल आहे. शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या प्रक्रीयेतील कामाबाबत तक्रार असल्यास संबंधित तहसिलदारांकडे लेखी स्वरुपात तक्रार करून पोहोच घेण्याचे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे. तसेच हंगामातील या प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने पिक विम्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरु करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगितले.


 
Top