उस्मानाबाद / प्रतिनिधी -
शहरातील कपीलधार स्मशानभूमीची देखभाल करणारे रामा गंधेवाड (वय 65) यांचे आज (दि.05) निधन झाले. गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीत कोणाचाही अंत्यविधी असो, स्वतः पुढाकार घेऊन अंत्यविधीच्या तयारीपासून दहाव्या, तेराव्यापर्यंत मयताच्या कुटुंबीयांना सहकार्य करणारे गंधेवाड उस्मानाबादकरांच्या परिचयाचे झाले होते. कुटुंबीयांसह ते कपीलधार स्मशानभूमीतच वास्तव्याला होते. कोरोना काळात मृतापासून स्वतःचे कुटुंबीय सुद्धा दूर राहात होते. अशा कोरोनाबाधित मृतांवर नगर परिषदेमार्फत अंत्यविधी केला जात असताना त्यांचे सहकार्य देखील लाभत होते. त्यांच्या निधनामुळे समाज माध्यमांवर श्रद्धांजली वाहून उस्मानाबादकरांनी शोक व्यक्त केला.