महिलांना आधार देण्याच काम नीलम ताई करतात : उद्धव ठाकरे

मुंबई  / प्रतिनिधी-

 शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे आज करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार रविन्द्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे, उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्यकारी अधिकारी सुप्रिया घोटाळे, पुणे शहरसंघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, अश्विनी शिंदे, कौस्तुभ खांडेकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळातील कामकाजा दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना ज्या प्रकारे फटकारले, तो संदर्भ देत म्हणाले की, निलमताई काल परवा तुम्ही सभागृहाची उंची राखली. तुम्ही मंत्र्यांना खडसावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद, तो कोण होता म्हणून नाही तर आपण जिथे बसलो, ज्या पदावर बसलो. त्याला न्याय देताना आपण कुठे आलो आहोत याचं भान राहीला पाहिजे. या सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. उद्या कोणताही मुख्यमंत्री कसाही वागला तर त्यांची कानउघडणी केलीच पाहिजे आणि ते तुम्हाला करावे लागणार, अशा शब्दात सभागृहातील बेशिस्तीवर यांच्यावर सडकून टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात. आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडता कामा नये. महिला अत्याचारात कोणतीही जातपात पाहू नये. स्त्री म्हणूनच या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. मग बिल्किस बानो असो की भंडाऱ्याचं प्रकरण असो किंवा निर्भया प्रकरण असो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिला अत्याचारावर आपल्या कार्यकर्त्याला दयामाया दाखवू नये. तुमचं सरकार म्हणून आम्ही बोंबलतोय. आमचं सरकार म्हणून तुम्ही बोंबलणार असा कोडगेपणा असू नये. सर्वांनी एकत्र येऊन महिला अत्याचारावर काम केलं पाहिजे, अशी भूमिका सध्याच्या एकूणच परिस्थितीवर त्यांनी मांडली.

नीलम गोऱ्हे यांच्या कार्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्यावर, तिथे जाऊन कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना आधार देण्याच काम नीलम ताई यांनी आजपर्यंत केले आहे. मी नीलम ताईंना सांगण्या अगोदर, साहेब मी घटनेच्या ठिकाणी आहे. हे आजवर मी अनेकदा पाहिले असून एखाद्या महिलेमध्ये क्वचित अशी वृत्ती पाहण्यास मिळते. अशा शब्दात त्यांनी आजवरच्या कार्याच उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.

महिला कार्यकर्ता ते विधान परिषद उपसभापती पदापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता : डॉ. नीलम गोऱ्हे

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आजवर मला ज्या जबाबदार् या दिल्या. त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. महिला कार्यकर्ता ते विधान परिषद उपसभापती पदापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिक यांनी साथ दिल्याने इथवर पोहोचू शकले आहे. त्या दरम्यान अनेक भूमिका पार पाडता आल्या आणि आज विधान परिषदेच्या कामकाजा बद्दल कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव जी ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या बद्दल मला आनंद आहे. तसेच आता यापुढील काळात देखील समाज प्रबोधन व वैधानिक काम वाढविण्यावर भर देणार असल्याची ग्वाही यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

 
Top