महिला प्रवाशाची बॅग गहाळ प्रकरण

उस्मानाबाद दि.३० (प्रतिनिधी) - किंमती सामान असलेली बॅग प्रवासादरम्यान बसमध्ये घेण्याची विनंती संबंधित बसचे चालक व वाहक यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याच खास शैलीमध्ये ती बॅग बसमध्ये न घेता बसच्या पाठीमागील डिग्गीमध्ये ठेवण्यासाठी  महिला प्रवाशास भाग पाडले हे विशेष. प्रवासादरम्यान ती बॅग गहाळ झाल्यामुळे याची तक्रार संबंधित आगार प्रमुख व पोलिस ठाण्यात केली, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. उस्मानाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने सर्व बाबी तपासून याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाला १ लाख ८० हजाराचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी विधीज्ञ अक्षय जगदीश देशपांडे-झरेगांवकर यांनी त्या ग्राहकाची सक्षमपणे बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी येथील शुभांगी नंदकिशोर बारगजे या पती व दिरासह त्यांच्या लेडीज शॉपीचा माल खरेदीसाठी दिल्ली येथे गेल्या होत्या. त्या दि. ३ जून २०१८ रोजी दिल्ली येथून जामखेड येथे आल्या. जामखेड येथून बारगजे या रात्री २ वाजता तुळजापूर आगाराच्या शिवशाही बस नाशिक-तुळजापूर या बसमध्ये बसल्या. बसमध्ये बसण्यापूर्वी त्यांची माल खरेदी केलेली व इतर साहित्य असलेली ट्रॅव्हल बॅग बसच्या पाठीमागील डिग्गीमध्ये ठेवण्यासाठी बसचे वाहक व चालक यांनी सांगितले. त्यावेळी सदर ट्रॅव्हल बॅगमध्ये किंमती वस्तु असल्याची माहिती शुभांगी नंदकिशोर बारगजे यांनी चालक व वाहकाला सांगून ती बॅग बसमध्ये घेण्याची विनंती केली. परंतू ती ट्रॅव्हल बॅग बसमध्ये घेण्यास वाहकाने नकार देत ती बॅग बसच्या मागील डिग्गीमध्ये ठेवण्यासाठी सांगितले. त्या ट्रॅव्हल बॅगमध्ये खरेदी केलेले सामान, सोन्याचे गंठण व इतर साहित्य असे एकूण १ लाख ७४‌ हजार रुपयांचे सामान ठेवलेले होते.

वाशी तालुक्यातील पारडी फाटा येथे शुभांगी बारगजे या उतरल्या असता त्यांना त्यांची ट्रॅव्हल बॅग बसच्या डिग्गीमध्ये आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी त्याची तक्रार सदर बसच्या चालक व वाहकाकडे केली असता त्यांनी देखील बॅग शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू ती ट्रॅव्हल बॅग मिळून आली नाही. त्यानंतर बारगजे यांनी तुळजापूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व‌ वाशी पोलिस‌ ठाणे यांच्याकडे तक्रार केली. परंतू त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे बारगजे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विरुद्ध उस्मानाबाद येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी तक्रारी अर्ज दाखल केला होता. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बारगजे यांचा तक्रारी अर्ज मंजुर करुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्जदार बारगजे यांना गहाळ झालेल्या सामानाची नुकसान भरपाईची रक्कम म्हणून १ लाख ७४ हजार रुपये (एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये) तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम ३ हजार रुपये व तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांमध्ये अर्जदारांच्यावतीने विधीज्ञ अक्षय देशपांडे - झरेगांवकर यांनी काम पाहिले. तर त्यांना विधीज्ञ बालाजी गायकवाड यांनी सहकार्य केले.

 
Top