उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पुर्वी देशात गंगा-जमुना संस्कृती होती. हिंदु-मुस्लिम एैक्य होते. परंतू २०१४ नंतर द्वेष भावना पसरविण्याचे काम केले जात आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काश्मिर फाईल सारख्या चित्रपटाचे प्रमोशन होते. त्यामुळे समाजात द्वेष भावना पसरविण्यास अधिक मदत होते. देश सुधारण्याऐवजी देशाची परिस्थिती बिघडत आहे. रेल्वे, एअर इंडिया व इतर कांही सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण केले जात आहे. यामध्ये मुस्लिम समाजाचे १ टक्केच लोक नौकरीला असले तरी हिंदु समाजातील ८८ टक्के लोक रेल्वे एअर इंडिया या कंपनीत आहेत. त्यामुळे आमचे एक टक्का नुकसान झाले तर हिंदु मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे समाजातील द्वेष भावना नष्ट करून सरकारी धोरणाच्या विरोधात आंदोलन करने महत्वाचे आहे, असे मत समाजवादी पार्टीचे नेते अामदार आबु आसीम आजमी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

शासकीय विश्रामगृह मध्ये शनिवार दि. २३ जुलै रोजी आबु आजमी यांची दुपारी पत्रकार परिषद झाली. यावेळी शेख मसुद, खलिल सय्यद आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना आबु आजमी यांनी इस्लामशी संबंधीत शहराची नावे बदलण्याचे आज सरकार करत आहे. नाव बदलल्याने कोणताही विकास होणार नाही किंवा कोणाला रोजगार ही मिळणार नाही, उलट हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे. मीर अली उस्मान यांनी चीन भारत युध्दाच्या वेळेस ६ टन सोने युध्दाला मदत म्हणुन तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांना दिले होते. तर उस्मान यांनी काढलेल्या शैक्षणीक संस्थेत पी.व्ही.नरसिंहराव, माजी केंद्रीय मंत्री  शंकरराव चव्हाण यांचे शिक्षण झाले आहे, अशा व्यक्तींच्या नावाने शहराला उस्मानाबाद हे नाव दिले होते, असे आजमी यांनी सांगितले. 

श्रीलंके सारखी परििस्थती निर्माण होण्याची शक्यता 

प्रधानमंत्र्यांनी पहिल्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्येकाला १५-१५ लाख रुपये वाट्याला येतील, असे सांगितले होते. परंतू आज परिस्थिती वेगळी आहे. श्रीलंकेवर फक्त ५ हजार ५१ कोटी रुपये कर्ज होते. त्यामुळे देश बरबाद झाला.  आपल्या भारत देशावर सध्या १ लाख ३६ हजार कोटी रुपये कर्ज आहे. त्यामुळे देश श्रीलंकेच्या वाटेपर कधी जाईल हे सांगता येत नाही, असा दावा ही आजमी यांनी केला. 

५०  हजार कोटीचे संसद भवन 

देशात बेरोजगारी, गरीबी, मोठ्या प्रमाणात असताना प्रधानमंत्री यांनी नवीन संसद भवन निर्माण करण्यासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या खर्चातच सुसज्ज हॉस्पीटल बांधले असते तर लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत झाली असती. किंवा बेरोजगारांसाठी कांही उपक्रम राबविला असता तर सर्व समाजातील युवकांना त्यांचा लाभ झाला असता. असे आबु आजमी यांनी संागितले. 

 
Top