तुळजापूर /प्रतिनिधी

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला कारची जोरात धडक बसून सहा वारकारी जखमी झाले असून यामध्ये एक सात वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. हा प्रकार रविवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडला.

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गावाजवळ उभारलेल्या पिकअपला (क्र. एमएच-२६ बीई ७७२०) पाठीमागून येणाऱ्या कारने (क्र.एमएच ०२, एव्ही ५०९४) धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, कारही रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. यात पिकअप मधील विनोद पारधे (७, रा. नांदेड) चिमुकला गंभीर जखमी झाला. कारमधील रुपसिंग बाबू राजपूत, जिबाऊ आनंदसिंग राजपूत, मुजीब उस्मान शेख, मनीषा जिबाऊ राजपूत, बिना रूपसिंग राजपूत (सर्व रा. गोरेगाव-मुंबई) येथील वारकरीही जखमी झाले असून यांच्यावर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारधे यास सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाविक रस्त्याशेजारी पिकअप उभे करुन स्वयंपाक करत होते. सोलापूरकडून तुळजापूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअपला पाठीमागून जोराची धडक दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.


 
Top