उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अतिरिक्त झालेला ऊस उस्मानाबाद जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे सन 2021-22 जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पाठवला होता. ऊस पाठवून चार महिने होत आले. परंतु साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत ऊस बिलाची पहिली उचल दिलेली नाही. त्यामुळे येत्या चार दिवसात पहिली उचल द्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करु असा इशारा मंगळवारी (दि.12) जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

या निवेदनात श्री दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांमध्ये पावसाच्या आगमन झालेल्या असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करत आहेत. सध्या शेतकर्‍यांच्या समोर अनंत आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी पैशाच्या अडचणीमुळे आत्महत्या केलेल्या आहेत, असे असताना शिक्षणाचा खर्च, दवाखाना अशा मोठ्या संकटात शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी ज्या साखर कारखान्यांनी उसाची पहिली रक्कम अद्याप दिलेली नाही, अशा कारखान्यांकडून उसाची पहिली उचल चार दिवसात देण्यास संबंधित कारखान्यांना सुचित करावे, अन्यथा या कारखान्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

 
Top