परंडा / प्रतिनिधी-
नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी ओबीसी उमेदवाराला सत्तावीस टक्के जागा सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंडा पालिकेच्या निवडणुकीत हाच फार्मला वापरण्यात येणार असल्याचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना मोटे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील परिस्थिती पाहता. परंडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात नगर परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आलेले आहेत. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातही सर्वाधिक निधी मी परंडा शहराला दिलेला आहे. नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी आपल्या कार्य कौशल्याच्या माध्यमातून शासन दरबारी करोडो रुपयांचा निधी खेचून आणलेला आहे. शहराच्या विविध भागात शहरवासीयांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणारी मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आलेले आहेत. याच बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पालिकेचे निवडणूक स्वभावावर लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी ओबीसीला सत्तावीस टक्के जागा सोडणार असल्याचे स्पष्ट केले असून परंडा पालिकेच्या निवडणुकीत हाच फार्मला वापरण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी शहरातल्या सर्वच भागात जल वाहिनीची कामे, स्मशानभूमीची कामे, काँक्रीट रस्त्याची कामे त्यासोबतच गटारीच्या कामाची यादीच वाचून दाखवली. येणाऱ्या निवडणुकीत पालिकेतील सर्वच्या सर्व वीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस मोठा मताधिक्याने जिंकेल असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला. बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवनाथ जगताप, डीजे ग्रुपचे अध्यक्ष धनंजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड संदीप पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष वाजिद दखनी, ज्येष्ठ नेते मसरत काजी, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापु मिस्किन, भाऊसाहेब खरसडे, विश्वजीत मोटे, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, नगरसेवक संजय घाडगे, सर्फराज कुरेशी, बब्बू जुनेरी, बच्चन गायकवाड, राजकुमार माने, शफी पठाण, शफिक मुजावर यांच्यासह शहरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जागा अपुरी पडल्याने शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी नगराध्यक्ष सौदागर यांच्या निवासस्थाना बाहेर दिसून येत होती.