उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद येथे मराठवाड्यातील क्षेत्रीय बँकांची आढावा बैठक तसेच कर्जवाटप मेळावा संपन्न.

  उस्मानाबाद येथील हॉटेल ॲपल येथे मराठवाड्यातील सर्व बँकांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन माननीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली एस.एल.बी.सी. महाराष्ट्र मार्फत करण्यात आले होते.

या प्रसंगी व्यासपीठावर राज्यसभा खासदार  दुष्यंतकुमार गौतम, तुळजापुरचे आमदार  राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता,एस.एल.बी.सी महाराष्ट्र चे डी.जी.एम. श्री.राजेश देशमुख, एस.बी.आय चे नांदेड विभागाचे डी.जी. एम.आकुला श्रीनिवास, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष  मिलिंद घारड तसेच नितीन काळे उपस्थित होते.

प्रथम मराठवाड्यातील बँकांच्या 2021-22 या वित्तीय वर्षातील एकंदर कामगिरीचा आढावा मा.भागवत कराड यांनी घेतला तसेच चालू वर्षात पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेस गती देण्याच्या सूचना मराठवाड्यातील सर्व बँकांना दिल्या. पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या आत्मनिर्भर भारत योजनेस पूर्णत्वास नेण्यासाठी बँकांनी त्यांची जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. भारत सरकारच्या सुरक्षा बिमा योजना,जीवन ज्योती बिमा योजना,जन धन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, स्टँड अप इंडिया योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना,बचत गटांना होणारा वित्त पुरवठा यांचा आढावा  अर्थ राज्यमंत्री भारत सरकार यांनी घेतला व बँकांच्या अधिकाऱ्यांना या सर्व फ्लॅगशीप योजना जास्तीत जास्त जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिल्या.

मराठवाड्यातील बँकांच्या शाखांची संख्या ही महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा कमी असल्यामुळे कर्जपुरवठा आवश्यक गतीने होत नाही त्यामुळे सर्व बँकांना मराठवाड्यामध्ये नवीन शाखा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या ज्यास बँकांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात माननीय डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते जिल्ह्यातील बँकांमार्फत विविध शासकीय योजने अंतर्गत साधारण 15 कोटी इतक्या रकमेच्या कर्जप्रस्तावांना   मंजूरी देण्यात आली.या लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व माननीय मंत्री महोदयांनीही त्यांच्याशी संवाद साधला. या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन हे एस.एल.बी.सी. महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.आय.चे क्षेत्रीय प्रबंधक श्री.विलास शिंदे यांनी केले होते. 

 
Top