उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 31 मे जागतिक तंबाकू विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्था, शासकीय निमशासकीय संस्था, खाजगी कार्यालये, जिल्हा रुग्णालय. उपजिल्हा रुगणालये, ग्रामीण रुग्णालये आणि आरोग्य केंद्र  इत्यादी ठिकाणी तंबाखू विरोधी शपथ, जनजागृती विषयक रॅली आणि विविध कायक्रम घेण्यात आले.

 येथील जिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू विरोधी शपथ घेऊन जन जागृती रॅली काढण्यात आली. याप्रसंगी डॉ.पाटील यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती देऊन रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग कॉलेज तसेच के.टी पाटील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा,घशाचा, फुप्फुसाचा, पोटाचा, किडनीचा किंवा मुत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो. भारतामध्ये तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हृदय तसेच रक्तवाहिन्यांच्या विकार लोकांमध्ये दिसून येतात. तंबाखू हे क्षयरोग होण्याचे अप्रत्यक्ष कारण आहे. धूम्रपान      करणा-यामध्ये क्षयरोग तीन पटीने अधिक आढळतो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यानंतर अचानक रक्तदाबात बदल होतो.यामुळे पायाकडे रक्तप्रवाहात कमतरता होऊन पायात गॅंग्रीन होण्याची शक्यता वाढते.तंबाखू किंवा धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. 

तंबाखूपासून दूर राहिल्यास व्यक्तीचे जीवन 20 वर्षाने वाढू शकते.  तंबाखूचे सेवन सोडल्यास कर्करोग हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. हृदयावर येणारा दाब कमी होतो धूम्रपान सोडल्यास धुराचा त्रास कुटुंबातील तसेच सोबत राहणा-या लोकांवर होत नाही.  धुम्रपानामुळे होणारा खोकला आणि इतर आजारांपासूण बचाव होतो . तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने दात आणि हिरड्या यांवर घाण जमते.त्यामुळे दात स्वच्छ व शुभ्र ठेवण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे असे आवाहन या विविध कार्यक्रमातून करण्यात आले.

 येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे, जिल्हा प्रजनन व बाल अधिकारी डॉ. के.के. मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड यांनी उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ दिली. या प्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पांचाळ, सहाय्यक प्रशासन अधिकारी लक्ष्मण गीरी, साहयक लेखा अधिकारी श्रीमती होळकर तसेच  सर्व तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.

 दिनांक 30 मे 2022 रोजी उस्मानाबाद येथील पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी श्री.शेरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू विरोधी शपथ घेऊन कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 बाबत जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ.विक्रांत राठोड यांनी माहिती दिली.

  उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पठाण आणि डॉ.अब्रार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू सेवन केल्याने होणा-या दुष्परिणामांबाबत माहिती देऊन तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखूविरोधी शपथ घेऊन तंबाखूवरील दुष्परिणामांबद्दल माहिती देण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे रुग्णांच्या नातेवाइकांना तंबाखू मुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती देऊन तंबाखू नियंत्रण कायदा 2003 बाबत माहिती देऊन तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच तंबाखूजन्य पदार्थाची होळी जाळून लोकांना या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल वाघमारे यांनी केले.उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे रुग्णांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे होणारे दुष्परिणामाबद्दल माहिती देऊन रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांना तंबाखूविरोधी शपथ देण्यात आली.

अशाप्रकारे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय मध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने तंबाखू विरोधी दिनाची शपथ देऊन व तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिनामाविषयी जनजागृती करून तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.

 
Top