उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वाशी तालुक्यातील सरमकुंडी फाटा येथे वास्तव्यास असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सुमारे पन्नास ते साठ कुटुंबांच्या झोपड्या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला असून शासनाकडून तात्काळ निवासाची तसेच अन्नधान्याची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशीच्या तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यापूर्वीही या प्रश्नावर निवेदन दिलेले असताना दखल न घेतल्यामुळे सात दिवसात मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी अवकाळी पाऊस व वादळाचा फटका बसलेल्या कुटुंबीयांसह आज (दि.2) वाशी येथे तहसिलदारांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, 30 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे सरमकुंडी फाटा येथे वास्तव्यास असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी कुटुंबाच्या पन्नास ते साठ झोपड्या वार्‍याने उडून गेल्या. झोपडीतील अन्नधान्य, स्वयंपाक भिजून गेला. काहीजणांना पालाचे खिळे लागून जबर मार लागला. तर भांडीही वार्‍याने उडून गेली. त्यामुळे ही कुटुंबे रात्रभर चिखलातच बसून राहिली. सध्या पावसाळ्याच्या तोंडावर आणखी काही दिवस वादळाचे व पावसाचे असल्यामुळे हे कुटुंबीय असुरक्षित आहेत. शासनाने पंचनामा करुन या कुटुंबांना अन्नधान्य तसेच राहण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, 7 जूनपर्यंत मदत न मिळाल्यास धान्याच्या गोदामाला टाळे ठोकण्यात येईल, असेही जिल्हाध्यक्ष गपाट यांनी निवेदनात म्हटले आहे. 

 
Top