तेर / प्रतिनिधी-

 वानेवाडी ता. उस्मानाबाद  गावाची निवड राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत करण्यात आली आहे या योजनेविषयी महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा व महिला शेतकऱ्यांमध्ये या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  वाणेवाडी येथे या योजनेअंतर्गत 100 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प महिला शेतकऱ्यांकरिता 30 टक्के आरक्षणीत ठेवण्यात आला आहे. महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करून या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येऊ शकते .ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांची लकी ड्रॉ पद्धतीने अंतिम निवड करण्यात येणार आहेत या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना 6500 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये बियाणे ,सूक्ष्म मूलद्रव्ये, गंधक ,विद्राव्य खते, कामगंध सापळे इत्यादी बाबी करिता अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे .तरी महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी कृषी सहाय्यक वैभव लेनेकर यांनी केले. 

 तसेच दिनांक 23 मे ते 7 जून या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या बीजप्रक्रिया पंधरवडा कार्यक्रमानिमित्त महिला शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया चे महत्त्व समजावून सांगितले. सोयाबीन पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडींच्या नियंत्रणाकरिता सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता

 अझॉक्सीस्ट्रॉबीन + थियोफिनेट मिथाईल + थायोमिथोक्झाम या बुरशीनाशक व कीटकनाशक असलेल्या संयुक्त औषधाची (जे बाजारामध्ये वॉर्डन , कॅसकेड, इलेक्ट्रॉन या नावाने उपलब्ध आहे)  प्रति किलो पाच मिलि प्रमाणे सोयाबीन बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.ही बीज प्रक्रिया  केल्यास खोड माशी, चक्री भुंगा, शेंगावरचा करपा व मर आदी सर्व रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. किंवा कार्बोक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची  प्रति किलो तीन ग्रॅम प्रमाणे सोयाबीन बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात किमान 10% वाढ होते. तसेच रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रति किलो सहा मिली प्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास पिकाची जोमदार वाढ होते व खतांची बचत होऊन उत्पादनात वाढ होते. असे कृषी सहाय्यक लेनेकर यांनी सांगितले.

या शेती शाळेमध्ये महिला शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेचे  प्रात्यक्षिक स्वतः करून दाखविले. यावेळी मीरा जाधव, सुरेखा उंबरे, मिराबाई उंबरे, आशा केसकर ,उमा उंबरे मिनाक्षी उंबरे, छाया बरे ,लक्ष्मी चव्हाण यांच्यासह महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top