धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या सन 2025-26 च्या द्वितीय गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या पहिल्या पंधरवाड्यातील ऊसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. चाचणी गळीत हंगामापासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा द्वितीय हंगामातही कायम ठेवण्यात आली असून शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या शाखेत जावून आपले बिल असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
जागजी शिवारात उभारण्यात आलेल्या एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्यामार्फत चाचणी गळीत हंगामापासून गाळपास आलेल्या ऊसाचे बिल पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केली होती. यंदाच्या गळीत हंगामात देखील त्यांनी मोळीपूजन कार्यक्रमात दिलेल्या शब्दाप्रमाणे पहिल्या पंधरवाड्यातील ऊसाचे 2500 रूपयेप्रमाणे बिल तात्काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहे.
तोडणीनंतर गाळपास आलेल्या ऊसाचे अवघ्या पंधरा दिवसांत बिल अदा करणारा कारखाना म्हणून एनव्हीपी शुगरने चाचणी हंगामापासून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. यावर्षीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे अडचणी आल्या तरी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबवून हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हित समोर ठेवलेले आहे. त्यामुळे द्वितीय हंगामातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एनव्हीपी शुगरला ऊस देण्यासाठी कल वाढला आहे.
कारखान्याला ऊस गाळपासाठी दिलेल्या शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे, यापुढेही गाळपास आलेल्या ऊसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अवघ्या पंधरा दिवसांत जमा करण्यात येईल असेही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी सांगितले.
