उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजित खोत यांन केली आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस उस्मानाबादेत येऊन एकाचवेळी अनेक ठिकाणी अवैध धंद्यांवर धाडी टाकतात. लाखोचा मुद्देमाल जप्त करुन  अनेकांना ताब्यात घेतात. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या डोळ्यादेखत हे प्रकार राजरोसपणे चालू असताना  स्थानिक गुन्हे शाखेसह दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक का दुर्लक्ष करत होते? याची पोलखोलच या कारवाईमुळे झाली आहे. त्यामुळे  अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या पोलिसांची गय न करता कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे अ‍ॅड. खोत यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक व औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक  व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद यांना इ-मेलद्वारे आज (दि.14) निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. के.एम. प्रसन्ना यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस अधीक्षक श्री.पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात दि. 13 ते रोजी एकाच दिवसात डझनभर ठिकाणी खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाया करुन पन्नासहून अधिक जणांना ताब्यात घेतले. लाखोचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मुख्यालयीच एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असतील तर इतर ठिकाणची परिस्थिती अशी असेल याचा अंदाज यावरुन येत आहे. उस्मानाबाद शहरात असलेल्या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेले जुगाराचे अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय चालणे शक्यच नाही. ऑनलाईन जुगार, मटका, चक्री, गांजा तस्करी यासारख्या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बेकार करण्याचे काम चालू आहे. दरवेळी त्याच त्याच व्यक्तींवर कारवाया करुन पोलीस ठाण्याचे दप्तर काळे करणार्‍या पोलिसांची अवैध धंदेचालकांसोबत मिलीभगत असल्याचे उघडपणे बोलले जात असल्यामुळे गृह खात्याने तरी यामध्ये लक्ष घालून अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणार्‍या पोलीस निरीक्षकांची चौकशी करण्याची गरज आहे.

अवैध धंद्याच्या माध्यमातून कोट्यवधीची संपत्ती जमा करुन निर्ढावलेले अवैध धंदेचालक पोलिसांवर हात उगारण्यासही कमी करत नसल्याच्या घटना उस्मानाबाद जिल्ह्यात अनेकदा समोर आलेल्या आहेत. त्यामुळे खाकी वर्दीची प्रतिमा डागाळत चालली आहे. हे कुठेतरी थांबवायला हवे. नाहीतर, कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा होऊन खाकी वर्दीचा धाक तर उरणारच नाहीच, पण सगळीकडे अराजकता माजण्यास केवळ निष्क्रिय पोलीस प्रशासन जबाबदार असेल. तरी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणार्‍या पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.


 
Top