उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी अवमानकारक पोस्ट करणारी केतकी चितळे या महिलेवर गुन्हा नोंद करुन तात्काळ अटक करावी तसेच  सदरील महिलेला पाठीशी घालणार्‍या व्यक्तींचीही चौकशी करुन कडक कारवाई करावी अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल शिंगाडे यांनी केली आहे.

उस्मानाबाद  शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना याबाबत   तक्रार देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याविषयी केतकी चितळे नामक महिलेने व्यंगात्मक, अपमानास्पद व अर्वाच्च भाषा वापरुन आदर्शवादी व्यक्तीमत्वाचा अवमान केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदरील महिलेविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंद करुन अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गुन्हा नोंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षांतर्गत सर्व विभागाच्या वतीने जिल्हाभरात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही तक्रारी निवेदनात म्हटले आहे.  त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, कार्याध्यक्ष ताहेर शेख, शहराध्यक्ष सुगत सोनवणे यांची स्वाक्षरी आहे.


 
Top