उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील समता नगर येथील जलतरण तलावात चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. तारेख मुनिफ शेख (वय 14) असे मृत मुलाचे नाव असून तो सुट्यामध्ये मामाकडे आला होता, अशी माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली. एकाच आठवड्यात जलतरण तलावात बुडुन मृत्यू झाल्याची उस्मानाबाद शहरातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तारेख हा आज दुपारी समता नगर येथील ब्लू कॉन नामक जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना नेमके काय घडले हे समजू शकले नाही.  त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

 
Top