उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थेत नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजेएनटी) आरक्षण देण्यासाठी  सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य हे 21 ते 28 मे 2022 या कालावधीत राज्यात विभागवार भेटी देणार आहेत. यासाठी समर्पित आयोगाने पुढील प्रमाणे विभागनिहाय भेटीचा कार्यक्रम निश्तिच केला आहे. औरंगाबाद विभागाची भेट 22 मे 2022 रोजी आहे.

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यासाठी समर्पित आयोगाने विभागवार हा कार्यक्रम जाहिर केला आहे.

 या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना स्वत:ची मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असेही स्पष्ट केले आहे.   

  समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - शनिवार दि.21 मे 2022 रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय (वेळ- सकाळी  9.30 ते 11.30), रविवार दि.22 मे 2022 रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय (वेळ- सकाळी  9.30 ते 11.30) आणि त्याच दिवशी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय (वेळ- सायं. 5.30 ते 7.30), बुधवार दि.25 मे 2022 रोजी कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालय (वेळ- दुपारी 2.30 ते 4.30), शनिवार दि.28 मे 2022 रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय (वेळ- सकाळी 9.30 ते 11.30) आणि त्याच दिवशी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय (वेळ- सायं. 4.30 ते 6.30) येथे समर्पित आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.


 
Top